गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंबात नाराजीचं वातावरण होतं अशी देखील चर्चा रंगली होती. यावर आता खुद्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लग्नामुळे कुटुंबात तणावाचं वातावरण होतं… अशी कबुली शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. शिवाय 23 जून रोजी लग्न होणार नाही… असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ’23 जून रोजी लग्न नाही. फक्त रिसेप्शन आहे, ज्यामुळे आम्ही सर्व कुटुंबिय आनंदाने सहभागी होणाार आहोत… माझ्या कुटुंबातील कधीच कोणी लग्नाबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण काही मीडिया आउटलेट्समुळे फक्त अंदाज लावण्यात आले आहेत…
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘लग्न सर्वांच्या घरात होतात. लग्नाच्या घरात भांडणं देखील होतात. ही साधी गोष्ट आहे. पण आता सर्व काही ठिक आहे. आता कोणती नाराजी नाही. लग्नाच्या घरात असं सगळं होत राहातं, शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलगी आहे म्हणून याचा अर्थ असा होत नाही की, तिला तिच्या आयुष्यात जे काही हवं आहे, ते तिला मिळणार नाही… 23 जून रोजी आम्ही आनंद साजरा करणार आहोत…’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
सांगायचं झालं तर, झहीर – सोनाक्षी यांचा मेंहदी सोहळा देखील संपन्न झाला आहे. त्यांच्या मेहेंदीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान, हनी सिंग, ‘हीरामंडी’ सीरिजमधील कलाकार यांना देखील रिसेप्शनसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न सोहळा फार कमी लोकांमध्ये पार पडणार आहे. तर बॉलिवूडकरांसाठी आणि दिग्गज व्यक्तींसाठी रिसेप्शनपार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आता सर्वांना सोनाक्षी – झहीर यांच्या पती – पत्नीच्या रुपात पाहायचं आहे.