अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी 23 जून रोजी लग्न केलं. या लग्नाला तिचा सख्खा भाऊ लव सिन्हा उपस्थित नव्हता. सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर बहिणीच्या लग्नानंतर लव सिन्हाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित निशाणाही साधला होता. आता सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या 50 दिवसांनंतर तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षी आणि झहीर हे दोघं ‘मेड फॉर इच अदर’ (एकमेकांसाठीच बनलेले) असून त्यांनी आमच्या आशीर्वादानेच लग्न केलंय, असं ते म्हणाले. त्यांनी बेकायदेशीर किंवा असंवैधानिक असं काहीच काम केलं नाही, अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना सुनावलंय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “हा लग्नाचा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, जर मुलांनी लग्न केलंय तर हे बेकायदेशीर किंवा असंवैधानिक नाही. त्यांनी आमच्या मर्जीने आणि आमच्या आशीर्वादाने लग्न केलंय. आम्ही त्याचं समर्थन करतो. जर मी माझ्या मुलीसोबत उभा नाही राहिलो तर कोण उभा राहणार? माझी पत्नी पूनम सिन्हा आणि मी या लग्नाचा जल्लोष साजरा करण्यासाठी त्यांच्यासोबत होतो. आमच्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण होता. आईवडील नेहमीच त्यांच्या मुलांच्या आनंदासाठी उभे राहतात आणि मला असं वाटतं की माझी मुलं खुश आहेत. मी त्यांना ‘मेड फॉर इच अदर’ असं म्हणेन. आम्हीसुद्धा त्यांच्यावर खूप खुश आहोत.”
सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर त्यांनी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा तर दिसले. मात्र सोनाक्षीचे सख्खे भाऊ लव आणि कुश कुठेच दिसले नव्हते. कुशने नंतर स्पष्ट केलं की तो बहिणीच्या लग्नाला उपस्थित होता. तर लवने बहिणीच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर लवने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित झहीरच्या कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.