अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबतचा एक जुना किस्सा सांगितला. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याविरोधात दिल्लीची निवडणूक (Delhi Election) लढवल्याने ते माझ्यावर खूप नाराज होते, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर निवडणूक झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी बोलणंच बंद केलं होतं. “मेरे खिलाफ तुम कैसे खडे हो गए”, असा सवाल राजेश खन्ना यांनी केला होता. या वादाच्या काही वर्षांनंतर राजेश खन्ना जेव्हा रुग्णालयात होते, तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा शत्रुघ्न यांनी बोलून दाखवली. मात्र त्याचवेळी ते स्वत:सुद्धा रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची भेट घेणार असं शत्रुघ्न यांनी ठरवलं होतं. मात्र त्यापूर्वीच राजेश खन्ना यांचं निधन झालं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “दिल्लीच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. या घटनेनंतर ते मला बरेच दिवस माफ करू शकले नव्हते. मेरे खिलाफ तुम कैसे खडे हो गए (माझ्याविरोधात तू कसा उभा राहिलास?) असा विचार त्यांनी केला. मी त्यांना म्हणालो, मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवत नाहीये. कोण कुठून निवडणूक लढवणार हे राजकीय पक्ष ठरवतो.”
“लालकृष्ण अडवाणी तिथे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. गांधी नगरमधून ते एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यांना एक सीट सोडावी लागली होती. तर त्यांनी दिल्लीची सोडून दिली. अडवणीजींनी दिल्ली सोडून दिली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली होती. राजेश खन्ना ती निवडणूक दोन ते तीन हजार मतांनी हरले होते. मग त्यांनी रिकाम्या जागेसाठी पुन्हा निवडणूक लढवली आणि मला त्यांच्याविरोधात उभं केलं गेलं”, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे स्पष्ट केलं.
निवडणुकीनंतर राजेश खन्ना यांनी बोलणं बंद केल्याचं शत्रुघ्न म्हणाले. “मी त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांनंतर मी त्यांची माफीसुद्धा मागितली होती. निवडणुकीच्या काही वर्षांनंतर मी जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा राजेश खन्ना हे सुद्धा तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात होते. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी थेट त्यांना भेटायला जाईन, असं मी माझी मुलगी सोनाक्षीला सांगायचो. पण मी त्यांना भेटू शकलो नाही. राजेश खन्ना यांच्या निधनाची बातमी मला सोनाक्षीनेच सांगितली”, असं ते म्हणाले.
शत्रुघ्न आणि राजेश यांनी मुकाबला, दुश्मन दोस्त, नसीब, दिल-ए-नादान, मकसद, आज का एमएलए राम अवतार यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.