अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येत्या 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांना काही सेलिब्रिटींनीही दुजोरा दिला आहे. मात्र आपली मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न करत असल्याने वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आईसुद्धा सोनाक्षीवर खूप नाराज असल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर शत्रुघ्न सिन्हा हे लेकीच्या लग्नालादेखील उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा होती. या सर्व चर्चांवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते या सर्व चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाले. त्याचप्रमाणे त्यांनी सोनाक्षीवर नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय.
‘झूम’ या वृत्तवाहिनीशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मला सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे? हे माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचं आयुष्य आहे आणि तिच्यावर मला खूप अभिमान आहे. माझी ती लाडकी लेक आहे. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ मानते. मी लग्नाला नक्कीच उपस्थित राहणार आहे. मी माझ्याच मुलीच्या लग्नात का उपस्थित राहणार नाही? या सर्व चर्चा खोट्या आहेत. सोनाक्षीला तिचा लाइफ पार्टनर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसोबत खूप चांगले दिसतात, त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र घालवायचं आहे.”
सोनाक्षी आणि झहीरच्या नात्याबद्दल नाराज असल्याची अफवा पसरवणाऱ्यांनाही शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. याविषयी ते पुढे म्हणाले, “जे लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत, ते या आनंदाच्या प्रसंगी खूपच निराश आहेत. कारण ते फक्त खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांना मी माझ्या अंदाजात सावध करू इच्छितो की ‘खामोश!’ यात तुमचं काहीच देणंघेणं नाही.”
सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिचा भाऊ आणि आईसुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा याला जेव्हा बहिणीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, “मी सध्या मुंबईबाहेर आहे. ज्या बातम्या पसरत आहेत, त्याविषयी हा प्रश्न असेल तर मला त्यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही किंवा माझं त्याच्याशी काही देणंघेणं नाही.” याआधी दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनीसुद्धा मुलीच्या लग्नाविषयी काहीच माहित नसल्याचं म्हटलं होतं. “मलासुद्धा माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मीडियामधूनच समजतंय. आजकालची मुलं परवानगी घेत नाही, थेट निर्णय सांगतात,” असं ते म्हणाले होते.