मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटवर गळफास घेवून आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या आईने एक्स बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी अभिनेत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिशाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता शिझानच्या वकिलांनी तुनिशाच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिझानच्या वकिलांनी तुनिशाचे कुटुंबासोबत संबंध चांगले नसल्याचा दावा केला आहे. पत्रकार परिषदेत शिझानचे वकील म्हणाले, ‘तुनिशाच्या आईने तिचा गळा दाबला होता. तुनिशा ज्या मालिकेमध्ये काम करत होती, त्या मालिकेच्या दिग्दर्शकांना देखील अभिनेत्रीने हा प्रकार सांगितला होता.’
याशिवाय अभिनेत्याच्या वकिलांनी संजीव कौशल या नावाचा देखील उल्लेख केला. ‘संजीव कौशल तुनिशाच्या आईचे मित्र आहेत. तुनिशा संजीव यांना प्रचंड घाबरायची. संजीवमुळे तुनिशाला अनेकदा एंग्जायटी सारख्या त्रासाला सामोरं जावं लागलं. याच कारणामुळे तुनिशा तिचा मित्र कंवर ढिल्लोंसोबत जवळपास ३ महिने राहिली.’ असं देखील शिझानचे वकील म्हणाले.
आई द्यायची नाही पैसै!
तुनिशाने मेहनतीने कमावलेले पैसे तिची आई स्वतःकडे ठेवत असल्याचा दावा शिझानच्या वकिलांनी केला. ‘तुनिशाची आई तिचे सर्व पैसे स्वतःकडे ठेवायची, मुलीला पैसे द्यायची नाही. तुनिशाला सतत तिच्या आईकडून पैसे मागावे लागयचे. एवढंच नाही, तर तुनिशाची आई वनिता शर्मा पैश्यांसाठी सतत लेकीला विचारत असायची..’ असं देखील अभिनेत्याचे वकिल म्हणाले.