मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी अखेर आरोपी शिझान खानच्या आईने मौन सोडलं आहे. सोमवारी शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर “तुमची काय इच्छा आहे की माझ्याही मुलानेही आत्महत्या करावी का”, असा सवाल शिझानच्या आईने तुनिशाच्या आईला केला. तुनिशा ही माझ्या मुलीसारखी होती. आमच्यासोबत तिचं खूप जवळचं नातं होतं, असं त्यांनी सांगितलं.
‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. हे दोघं एकमेकांना डेट करत होते. याच मालिकेच्या सेटवत तुनिशाने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येच्या काही तासांनंतर शिझानला अटक करण्यात आली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
“माझ्यासाठी ती मुलीसारखीच होती. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी हा प्रवास किती कठीण आहे हे मला माहीत आहे. एकीकडे अशी मुलगी आहे, जी माझ्या कुटुंबाच्या जवळची होती. तिचं वय जरी 20 वर्षे असलं तरी माझ्यासाठी ती 10 वर्षांची लहान मुलगी होती. दुसरीकडे माझा निष्पाप मुलगा आहे, ज्याने काहीच केलं नाही”, असं शिझानची आई म्हणाली.
आरोपांवर बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “तिची आई माझ्या मुलावर आरोप करतेय. वनिताजी (तुनिशाची आई) तुमची काय इच्छा आहे? एका मुलीने आत्महत्या केली आणि आता दुसऱ्या आईच्या मुलानेही आत्महत्या करावी का? तुमच्याकडून होत असलेल्या शोषणामुळे त्यानेसुद्धा तेच पाऊल उचलावं का?”
या पत्रकार परिषदेत शिझानची बहीण फलक नाझने तुनिशाच्या आईवर काही आरोप केले. शिझानच्या बहिणीने तुनिशाला दर्ग्यात नेलं होतं आणि हिजाब परिधान करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता, असे आरोप वनिता शर्मा यांनी केले होते. त्यावर आता शिझानच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
तुनिशाचे तिच्या आईसोबत चांगले संबंध नव्हते आणि तिच्या पैशांवर आईचंच नियंत्रण होतं, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला. तुनिशाला बळजबरीने हिजाब परिधान करण्यास सांगितल्याच्या आरोपांवर फलकने सांगितलं की तो तिच्या शूटिंगचा भाग होता. तुनिशा आणि शिझान हे ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या एका सीनदरम्यान तुनिशाने हिजाब परिधान केला होता, असं शिझानच्या बहिणीने स्पष्ट केलं.