आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शेफाली शाहने निर्माता विपुल शाहशी लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला 20 हून अधिक वर्षे झाली आहेत. या दोघांना आर्यमान आणि मौर्य ही दोन मुलं आहेत. मात्र शेफालीने विपुलच्या आधी अभिनेता हर्ष छायाशी लग्न केलं होतं. या दोघांनी झी टीव्हीवरील ‘हसरतें’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर शेफाली आणि हर्षने घटस्फोट घेतला. हर्षने ‘तारा’, ‘साया’, ‘जुस्तजू’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हर्ष शेफालीसोबतच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हर्ष म्हणाला, ‘तो काळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता.’
शेफालीला घटस्फोट दिल्यानंतर हर्षने बंगाली अभिनेत्री सुनीता गुप्ताशी लग्न केलं. या मुलाखतीत हर्ष म्हणाला, “ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. त्यानंतर खूप काळ उलटला आहे. जवळपास वीस-पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. आमच्यात आता मैत्रीचंही नातं नाही. मला तिच्याशी बोलायला काहीच समस्या नाही. त्यामुळे भविष्यात कधी आम्ही एकमेकांच्या समोर आलो, तर तिच्यासोबत बोलायला मला संकोचलेपणा वाटणार नाही. पण सध्या तरी आम्ही संपर्कात नाही.” हर्ष आणि शेफाली यांनी 1994 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर 2000 मध्ये दोघं विभक्त झाले.
याआधी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत हर्ष त्याच्या घटस्फोटाविषयी म्हणाला होता, “मला त्या गोष्टीचा त्रास झाला. घटस्फोटामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला नव्हता. कारण आठ महिने आधीपासूनच मला त्याची चुणूक लागली होती. मी अजूनही त्या गोष्टीकडे प्रॅक्टिकली पाहतो. दोन लोक भेटले, एकमेकांच्या प्रेमात पडले, लग्न केलं आणि विभक्त झाले. याबद्दल कोणीच काही करू शकत नाही. पण वैवाहिक आयुष्यात आपण नेमकं कोणत्या दिशेने जातोय हे माहित नसण्यापेक्षा विभक्त झालेलं चांगलं असं मला वाटलं होतं. माझ्यासाठी अर्थातच तो काळ खूप कठीण होता. पण त्यातून मी स्वत:ला सहा महिन्यात सावरलं.”
दुसऱ्या बाजूला शेफाली याबद्दल एका मुलाखतीत म्हणाली, “मी त्या नात्याला माझ्या आयुष्यातील खूप मोठा काळ होता. मी त्या नात्यासाठी खूप मेहनत घेतली होती. लग्न म्हणजे दोन लोक आयुष्यभर सुखाने नांदतात असं मला वाटायचं. पण नंतर मला समजलं की हे फक्त बोलण्यासाठी असतं. प्रत्यक्ष आयुष्यात गोष्टी तशाच घडतील याचा नेम नाही. पण मला लग्न केल्याचा पश्चात्ताप नाही. एका ठराविक काळानंतर तुमच्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, हे तुम्हाला कळू लागतं. ती गोष्ट सगळ्यांसाठी योग्य असते. त्यामुळे घटस्फोट घेताना मी त्या नात्यात गुंतवलेल्या माझ्या वेळेचा आणि मनाचा फारसा विचार केला नाही. कारण काही गोष्टी जमत नसतील तर त्यात अधिक प्रयत्न करू नये. लोक त्याबद्दल इतका मोठा विषय का करतात माहीत नाही.”