मुंबई : अभिनेत्री शेफाली शाह ही इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयकौशल्याने तिने बॉलिवूडमध्ये एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेफाली सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांबद्दल मोकळेपणे बोलत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीने तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट प्रसंगाचा खुलासा केला. गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं शेफालीने सांगितलं. “त्या घटनेमुळे मला स्वत:लाच इतकं वाईट वाटलं की त्याबद्दल कोणालाच काही सांगू नये असं ठरवलं होतं. मलाच त्या गोष्टीची खूप लाज वाटली”, असं ती म्हणाली.
शेफालीने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगितलं. या चित्रपटात तिने लहानपणी लैंगित शोषण झालेल्या रिया वर्माची भूमिका साकारली होती. यामध्ये तिच्यासोबत नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका होत्या.
चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलतानाच शेफालीने स्वत:चा अनुभव सांगितला. “जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण यातून गेला आहे. मला आठवतंय की मी एकदा बाजारात फिरत होते आणि गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यावेळी मला माझ्याबद्दलच काहीतरी घृणास्पद वाटत होतं. मी याविषयी कधीही काही बोलले नाही, कारण ती खूप शरमेची बाब होती”, असं शेफाली म्हणाली.
“असं काही घडल्यानंतर स्वत:च काहीतरी चुकीचं केलं होतं का, असा प्रश्न तुला पडला का”, असं मुलाखतकर्तीने शेफालीला विचारलं. त्यावर ती पुढे म्हणाली, “होय, मी तुझ्याशी सहमत आहे. अनेकजण असा विचार करतात की मी काही चुकीचं केलं का? तुम्हाला अपराधीपणा वाटतो, लाज वाटते आणि त्या घटनेविषयी विसरून जावंसं वाटतं. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर त्यावर मी इतका विचार केलाच नाही की या घटनेविषयी काय बोलावं? ती एक अशी घटना होती जी थेट माझ्या मनातून चित्रपटातील भूमिकेत रुतली गेली.”
शेफालीने ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वक्त’, ‘गांधी: माय फादर’ आणि ‘दिल धडकने दो’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘जलसा’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘डॉक्टर जी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत.