मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री शेफाली शाह नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपट आणि सेटवरील वातावरणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. याच मुलाखतीत शेफालीने आयुष्यात पुन्हा कधीच ऑनस्क्रीन अभिनेता अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वक्त : द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटात शेफालीने अक्षयच्या आईची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यावेळी स्वत: शेफाली अक्षयपेक्षा वयाने पाच वर्षे लहान होती. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अक्षय कुमार 37 आणि शेफाली 32 वर्षांची होती. या चित्रपटात अक्षय आणि शेफालीसोबतच अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका होत्या.
सेटवर काम करण्याचं वातावरण किंवा कलाकारांना दिली जाणारी वागणूक कशी असते याविषयी बोलताना शेफाली म्हणाली, “मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छिते की मला खरंच अत्यंत प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे मी फक्त दिखाव्यासाठी नाही तर सत्य आहे म्हणून सांगतेय. कदाचित मी अशा एखाद्या दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत काम केलं असेन, ज्यांची वागणूक अत्यंत आक्षेपार्ह होती. पण ते वगळता, मी अशा दिग्दर्शकांसोबत काम केलं, जे कलाकारांना फक्त कलाकार नाही तर सहयोगीसुद्धा समजतात.”
हे सांगत असतानाच शेफाली हसली आणि पुढे म्हणाली, “मी वचन देते की मी यापुढे अक्षय कुमारच्या आईची भूमिका कधीच साकारणार नाही.” याच मुलाखतीत शेफालीने चांगल्या कामाची ऑफर न दिल्याची खंत बोलून दाखवली. “मला उत्तम अभिनेत्री म्हटलं जातं, पण तसं काम कोणी देत नाही. 25 ते 30 वर्षे घालवल्यानंतर आता कुठे मला चांगल्या, मनासारख्या भूमिका मिळत आहेत. हे गेल्या चार वर्षांपासून होतंय”, असं ती म्हणाली. याचसोबत ‘दिल्ली क्राइम’ ही वेब सीरिज आपल्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा प्रोजेक्ट असल्याचं शेफालीने सांगितलं. याच सीरिजने मला योग्य मार्ग दाखवला, असंही ती म्हणाली.
शेफाली शाह ही इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयकौशल्याने तिने बॉलिवूडमध्ये एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेफाली सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांबद्दल मोकळेपणे बोलत नाही. त्यामुळे तिने अक्षय कुमारबद्दल केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.