मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. शहनाज अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शहनाजने बिग बॉसच्या तेराव्या भागातून चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. त्यानंतर अभिनेत्रीला अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये पाहण्यात आलं. पण आता सलमान खान याच्या सिनेमातून शहनाज नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या शहनाज ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
शहनाज नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचली होती. यावेळी अभिनेत्री बिग बॉसमध्ये मिळत असलेल्या मानधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सर्वात जास्त लोकप्रिय होवून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असं देखील शहनाज ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये म्हणाली.
कपिल याने विनोदी अंदाजात शहनाजला विचारलं की, ‘सलमान खानने होस्ट केलेल्या कार्यक्रमात मानधन पूर्ण न मिळाल्यामुळे त्याने सिनेमात कास्ट करण्याचा निर्णय घेतला का?’ कपिलच्या या प्रश्नावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, ‘बिग बॉसमध्ये तर मला फार कमी मानधन मिळालं. सर्वात स्वस्त मी होती, पण सर्वात महागडी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून बाहेर आली आहे…’ सध्या शहनाजने दिलेल्या उत्तराची तुफान चर्चा रंगत आहे.
बिग बॉसच्या घरात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाजची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला देखील डोक्यावर घेतलं. एवढंच नाही तर, शहनाज आणि सिद्धार्थ यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर अभिनेत्री पू्र्ण पणे कोलमडली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज अनेक दिवस सोशल मीडियावर आणि माध्यमांपासून दूर होती. पण आजही प्रत्येक ठिकाणी शहनाजला सिद्धार्थची आठवण सतावते.
अनेक संकटांचा सामना केल्यानंतर शहनाज लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शहनाज हिला भाईजानने सिनेमात संधी दिली आहे. त्यामुळे बिग बॉस आपल्या खोडकर स्वभावाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी शहनाज मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.