दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये अभिनेते शेखर सुमन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यामध्ये ते नवाब जुल्फिकारच्या भूमिकेत आहेत. या सीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन त्यांच्या मुलाच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. शेखर यांचा मुलगा अध्ययन सुमन हा अभिनेत्री कंगना राणौतला डेट करत होता. 2008 मध्ये कंगना आणि अध्ययनने डेटिंगला सुरुवात केली आणि त्याच्या वर्षभरातच त्यांचा ब्रेकअप झाला. या ब्रेकअपची चर्चा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत झाली होती. अध्ययनसोबत कंगनाचं वागणं अपमानास्पद होतं, असा आरोप शेखर यांनी काही मुलाखतींमध्ये केला होता. इतकंच नव्हे तर कंगनाने काळी जादू केली, असा आरोप अध्ययनने केला होता. आता ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन पुन्हा एकदा कंगना आणि अध्ययन यांच्या नात्याविषयी व्यक्त झाले. आता त्या दोघांमध्ये कोणतेच मतभेद नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘
“आपण सर्वजण आयुष्यातील विविध टप्प्यांतून जातो. जे आज योग्य वाटतं, ते कदाचित उद्या योग्य वाटणार नाही. एखाद्या रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ब्रेकअप करण्याची इच्छा कोणाचीच नसते. प्रत्येक जोडीला असं वाटतं की त्यांचं नातं अखेरपर्यंत टीकावं”, असं ते म्हणाले. अध्ययन आणि कंगना यांचं नातं तुटण्यामागचं कारण नशीब असल्याचंही त्यांनी सांगितलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “नशिबाची भूमिका वेगळी असते आणि तुम्हाला ते फॉलो करावं लागतं. कंगना आणि अध्ययन हे सोबत खुश होते. नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. हे त्यांच्या नशिबातच लिहिलं होतं. पण आता त्यांच्यात काही मतभेद किंवा नकारात्मक भावना नाही. कधीकधी रागाच्या भरात काही गोष्टी घडतात. पण तुम्हाला मागे वळून गोष्टींकडे प्रेमाने पाहता आलं पाहिजे.”
अध्ययन आणि कंगनाच्या नात्यावर बोलताना शेखर सुमन यांनी साहिर लुधियानवी यांच्या ओळी ऐकवल्या. “वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक खुबसूरत मोड देकर छोडना अच्छा”, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतेय. त्यावर शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही त्या गोष्टीवर अडकून बसलो नाही. मी, माझे कुटुंबीय आणि अध्ययनसुद्धा पुढे निघून गेले आहेत. हा त्यांच्या आयुष्यातील एक टप्पा होता. त्यावर कमेंट करणारे आम्ही कोण आहोत? आम्ही आमच्या मार्गावर पुढे निघून आलो आहोत. मागे वळून पाहण्यात आणि एखाद्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही”, असं ते म्हणाले.