संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता शेखर सुमन हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. शेखर सुमन यांनी त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे आयुषचं निधन झालं होतं. “मुलाच्या निधनानंतर माझा देवावरूनही विश्वास उडाला होता. मी माझ्या घरातून देवाच्या सर्व मूर्त्या बाहेर फेकल्या होत्या,” असं त्यांनी सांगितलं. मुलाची प्रकृती गंभीर असतानाही दिग्दर्शकाने शूटिंग पूर्ण करण्यासाठी सेटवर बोलवल्याचाही खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला.
‘कनेक्ट एफएम कॅनडा’ला दिलेल्या मुलाखतीत शेखऱ सुमन म्हणाले, “चमत्कार व्हावा यासाठी मी दररोज प्रार्थना करत होतो. पण चमत्कार घडत नाहीत. एकेदिवशी खूप जोरदार पाऊस पडत होता आणि त्यावेळी मुलाची प्रकृती गंभीर होती. माझ्या मुलाच्या तब्येतीविषयी माहित असतानाही दिग्दर्शकाने मला शूटिंगसाठी बोलावलं होतं. मी नाही येणार म्हटल्यावर त्यांनी मला विनंती केली, की फक्त दोन-तीन तासांच्या शूटिंगसाठी येऊन जात. नाहीतर माझं खूप नुकसान होईल. तेव्हा मी मुलाला सोडून शूटिंगसाठी जात होतो. आयुषने माझा हात धरला आणि म्हणाला, पापा तुम्ही आज नका जाऊ प्लीज. मी पुन्हा लगेच परत येईन असं आश्वासन देऊन तिथून निघालो होतो. तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.”
“मुलाच्या निधनानंतर माझा प्रत्येक गोष्टीवरून विश्वास उडाला होता. घरातील सर्व मूर्त्या मी बाहेर फेकल्या होत्या. देवघरातील मंदिरसुद्धा बंद केलं होतं. ज्या देवाने मला इतकं दु:ख दिलं, इतका त्रास दिला, त्याच्याकडे मी कधीच जाणार नाही असं ठरवलं होतं. देवाने माझ्याकडून माझ्या निरागस, सुंदर मुलाला हिरावून घेतलं. मी आजही त्या धक्क्यातून सावरलो नाही. आजही प्रत्येक दिवशी मला माझ्या मुलाची आठवण येते”, अशा शब्दांत शेखर सुमन व्यक्त झाले.
मुलाच्या उपचारासाठी ते त्याला लंडनला घेऊन गेले होते. मात्र कॉम्प्लिकेशनमुळे त्यांच्या मुलावर हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया होऊ शकली नव्हती. “आयुष्यात मला इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. जगभरातील नामांकित डॉक्टरांची मदत घेऊनही माझ्या मुलाच्या बाबतीत चमत्कार घडला नव्हता. इतकंच नव्हे तर मी बौद्ध धर्माकडेही वळलो होतो”, असं त्यांनी पुढे सांगितलं.