अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी संबंधित मुंबई, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या 15 मालमत्तांवर शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. ईडीने अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात ही कारवाई केली. कुंद्राच्या जुहू इथल्या निवासस्थान आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकले. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकरणात ईडीने राज कुंद्राची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राजला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटकसुद्धा केली होती. आता ईडीच्या छापेमारीनंतर राज कुंद्राची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘ज्यांच्याशी या गोष्टीचा संबंध असेल त्यांना मी स्पष्ट करू इच्छितो.. मीडियाला नाटकाची आवड तर आहेच, पण काही तथ्य समोर आणणं गरजेचं आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाला मी पूर्णपणे सहकार्य करतोय. सहकारी, पॉर्नोग्राफी आणि मनी लाँड्रींगचा दावा करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की याबद्दल कितीही सनसनाटी केली जात असली तरी सत्य ढगाआड लपणार नाही. अखेर न्यायाचा विजय होईल’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. यापुढे त्याने मीडियासाठी एक टीपसुद्धा लिहिली आहे. ‘माझ्या पत्नीचं नाव तिच्याशी संबंधित नसलेल्या प्रकरणांमध्ये वारंवार ओढणं मला अस्वीकार्य आहे. कृपया मर्यादांचा आदर करा’, अशी टीप त्याने लिहिली आहे. या पोस्टच्या अखेरीस त्याने ‘ईडी’ असा हॅशटॅग दिला आहे.
राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. तयार केलेला अश्लील चित्रपटांचा कंटेंट ‘हॉट हिट मुव्हीज’ आणि ‘हॉटशॉट्स’ या सबस्क्रिप्शन आधारित मोबाइल ॲप्सवर वितरित केला जात होता. ‘हॉटशॉट्स’ हे ॲप कुंद्राने 2019 मध्ये स्थापन केलेल्या आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केला गेल्याचा आरोप होता. आर्मस्प्राईमने नंतर कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षीच्या मालकीच्या युके स्थित केनरिन लिमिटेड कंपनीला हॉटशॉट्स विकलं. या प्रकरणाशी संबंधित कुंद्रा आणि अन्य तीन आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी याआधीच चार्जशीट दाखल केला आहे.
2021 मध्ये कुंद्राने तुरुंगात दोन महिने घालवले आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मंजूर झाला. कुंद्रा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. तसंच यासंदर्भात ईडी ही परदेशातील आर्थिक व्यवहारांचाही शोध घेत आहे. तसंच कुंद्राविरुद्ध बिटकॉइन स्कीमप्रकरणी तपासही करण्यात येत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये यंत्रणेनं बिटकॉइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात कुंद्राच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.