मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही चर्चेत असते. शिल्पाचं फिटनेस हे तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. शिल्पाने सध्या ‘शार्क टँक 2’मध्ये हजेरी लावलेल्या एका कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळेच ती सध्या चर्चेत आहे. मुंबईतल्या एका स्नॅक्स कंपनीत तिने पैसे गुंतवले आहेत. ‘विकेड गुड’ असं या कंपनीचं नाव आहे. इतकंच नव्हे तर त्यांची विक्री आणि मार्केंटिग वाढवण्यासाठी शिल्पा या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडरसुद्धा झाली आहे.
‘विकेड गुड’ या कंपनीत शिल्पाने 2.25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कंपनीची सुरुवात भुमन दानी, मोनीश देबनाथ आणि सौमल्या बिस्वास यांनी केली होती. ‘शार्क टँक इंडिया 2’ या शोमध्ये आल्यानंतर या कंपनीचे प्रॉडक्ट्स युएई, सिंगापूर, मॉरिशस आणि नेपाळसारख्या देशांमध्येही विकले जाऊ लागले आहेत. शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहित गुंतवणुकीची माहिती दिली आहे.
‘आमच्या कुटुंबाला जेवणाशी प्रेम आहे आणि तुमच्यासाठी उत्तम जेवण तयार करायचं काम हे लोक करतात. मी विकेड गुडची स्पेगेटी खाऊन पाहिली आणि त्याच्या चवीने मी खूपच प्रभावित झाले. मोठ्यांना तर ते आवडतंच आहे, पण जेव्हा मी माझ्या मुलांना ते खाऊ घातलं, तेव्हा त्यांनासुद्धा ती खूप आवडली. यामुळेच मला केवळ या ब्रँडचं प्रमोशन नाही तर त्यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळाली. विकेड गुडच्या मिशनला समर्थन देण्यासाठी मी फार उत्सुक आहे’, असं शिल्पाने लिहिलं आहे.
2021 मध्ये भुमन दानी, मोनीश देबनाथ आणि सौमल्या बिस्वास यांनी ‘विकेड गुड’ या कंपनीची स्थापना केली. गेल्या वर्षभरात या ब्रँडमध्ये 300 टक्क्यांची वाढ झाली. या कंपनीच्या अजिबात मैदा, तेल आणि एमएसजी नसलेले पास्ता आणि न्यूडल्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिल्पाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती ‘निकम्मा’ या चित्रपटात नुकतीच झळकली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. याशिवाय ती ‘नच बलिये’, ‘जरा नचके दिखा’ आणि ‘सुपर डान्सर’ यांसारख्या डान्स शोजमध्ये परीक्षक म्हणून झळकली आहे. शिल्पाने बिग बॉसचा दुसरा सिझनसुद्धा होस्ट केला आहे.