मुंबई : 25 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात त्याला अटक झाली होती आणि दोन महिने तो आर्थर जेलमध्ये होता. तुरुंगातील या दिवसांवर उपरोधिक भाष्य करण्यासाठी त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा तुरुंगातील दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. इतकंच नव्हे तर त्यावेळी शिल्पाने देश सोडून परदेशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता, असंही राजने सांगितलं.
“राज तुला परदेशात राहायचं आहे का, असा प्रश्न करणारी पहिली व्यक्ती माझी पत्नीच होती. तू लंडनमध्ये सर्वकाही सोडून आलास. तुझा जन्म तिथेच झाला आणि तिथेच तू लहानाचा मोठा झाला. पण मला भारतात राहायचं होतं म्हणून तू इथे स्थायिक झालास. पण तुझी इच्छा असेल तर मी तयार आहे. आपण हा देश सोडून जाऊयात. परदेशात स्थायिक होऊयात. त्यावेळी मी तिला सांगितलं की, मला भारतात राहायला आवडतं आणि मी हा देश सोडणार नाही. लोक मोठमोठे गुन्हे करून, हजारो कोटी कमावून देशातून निघून जातात. पण मी तर काहीच केलं नाही. त्यामुळे मी देश सोडणार नाही”, असं राजने सांगितलं.
या मुलाखतीत राजने तुरुंगातील दिवसांबद्दलही सांगितलं. “मी पूर्णपणे खचलो होतो. इतका की स्वत:चं काहीतरी बरंवाईट करून घेतलं असतं. मी तो शब्द वापरणार नाही. पण मी खरंच खचलो होतो. इतका अपमान झाला होता, प्रतिष्ठेला हानी पोहोचली होती. माझ्यामुळे मीडिया माझी पत्नी, मुलं आणि आईवडिलांच्या मागे लागली होती. ते सर्व खूप त्रासदायक होतं. बाहेर काय चाललंय हे मला समजत होतं”, असं राज पुढे म्हणाला. तुरुंगात असताना शिल्पाने पत्र लिहून राजला आधार देण्याचा प्रयत्न केला होता. ‘हे सर्व तात्पुरतं आहे. आपण यातून नक्कीच बाहेर पडू. तू खचू नकोस’, अशा शब्दांत तिने राजला आधार दिला होता.