नवी दिल्ली – शोले (Sholay)हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील (history of bollywood) मैलाचा दगड मानला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीत हिटचा फॉर्म्युलाच या सिनेमाने बदलवून टाकला. आजही हा सिनेमाची उंची कमी झालेली नाही. हे लक्षात घेऊनच, दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt)शोले या नावाचा वापर करत व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. शोले चित्रपटाच्या निर्मात्यांनी या व्यक्तीविरोधात खटला दाखल केला होता. न्यायाधीश प्रतिभा यांच्यासमोर हा ट्रेडमार्कच्या खटल्याची सुनावणी झाली. सिनेमा आणि त्यांच्या नावांना ट्रेडमार्क कायद्यांतर्गत मान्यता मिळू शकते, असा युक्तीवाद करण्यात आला. कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला आहे.
एका व्यापाऱ्याने नियमांचे उल्लंघन करीत शोले नावाने डोनेम रजिस्टर केले होते, असा सिनेमाच्या निर्मात्यांचा दावा होता. यातून शोले नावाने मासिक छापले आणि सिनेमांच्या छायाचित्र छापलेल्या वस्तूंची विक्री केल्याचेही त्यांचे म्हणणे होते. या व्यापाऱ्याने Sholay.com या नावाने एक वेबसाईट तयार केली होती. जी अमेरिकेत रजिस्टर करण्यात आली होती.
शोले हा मैलाचा दगड असलेला सिनेमा असल्याचे मत कोर्टानेही नोंदवले आहे. त्यामुळे हे नाव सुरक्षित राहावे आणि त्याचा गैरवापर होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज कोर्टाने व्यक्त केली. शोले सारख्या शिर्षकाला सामान्य शब्द ठरवता येणार नाही, ती सीमा या नावाने कधीच पार केली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्याला शोले चित्रपटाचे निर्माते शोले मीडिया एंड इन्टरटेन्मेंट पु्रायव्हेट लिमिटेड आणि सिप्पी फइल्म प्रायव्हेट लिमिटेड यांना २५ लाख रुपये द्यावेत, असे आदेश देण्यात आले. हे पैसे देण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधीही देण्यात आला.
शोले चित्रपटाच्या नावाने वेबसाईट तयार करणे आणि त्यावर शोलेच्या डीव्हीडी आणि इतर उत्पादने विकणे हे अनैतिक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एखाद्या सिनेमाने जर काही दशके जर सिनेरसिकांवर राज्य केले असेल तर तो शोले सिनेमा आहे. या सिनेमातील पात्र, अभिनेते, संवाद आणि बॉक्स ऑफिसवर त्याला मिळालेले यश हे अभूतपूर्व असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. भारतीय सिनेमात मोठा इतिहास घडवणारी, रेकॉर्ड ब्रेक सफलता मिळवणारा हा सिनेमा आहे. त्यामुळेच या नावाला विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. २३ मे रोजी कोर्टाने हा निर्णय दिलाय.
या सिनेमाच्या शिर्षकाची सुरक्षितता होऊ शकत नाही, असे प्रतिवाद्यांचे म्हणणे होते. सध्याच्या इंटरनेटच्या युगात यावरुन संभ्रमाची गरज नसल्याचेही त्यांचे म्हणणे होते. शोले या शब्दाचा डिक्शनरीत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सिनेमाचे निर्माते पैसे वसूल करण्यासाठी हा आरोप करत खटल्याला उभे राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.