Birbal Khosla | ‘शोले’ फेम अभिनेते बिरबल खोसला यांचं निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Sep 13, 2023 | 8:29 AM

ज्येष्ठ अभिनेते सत्येंद्र कुमार खोसला ऊर्फ बिरबल यांचं मंगळवारी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते रुग्णालयात दाखल होते. आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Birbal Khosla | शोले फेम अभिनेते बिरबल खोसला यांचं निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बिरबल खोसला यांचं निधन
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : हिंदी चित्रपटसृष्टीत बिरबल या नावाने ओळखले गेलेले ज्येष्ठ अभिनेते सत्येंद्र कुमार खोसला यांचं मंगळवारी (12 सप्टेंबर 2023) संध्याकाळी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. हिंदीसोबतच पंजाबी, भोजपुरी, मराठी अशा विविध भाषांमधील तब्बल पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जायचे. मूळचे पंजाबचे असलेले सत्येंद्र कुमार खोसला यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. सत्येंद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा परदेशात नोकरी करतो. त्यामुळे कुटुंबीय त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील.

सत्येंद्र हे गेल्या काही काळापासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत होते. मुंबईतल्या भारती आरोग्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना गुडघ्यांमध्ये त्रास जाणवत होता, त्यामुळे ते चालू शकत नव्हते. मात्र तरीही वर्षभरापूर्वीपर्यंत ते चित्रपटांमध्ये काम करत होते. सत्येंद्र यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची पत्नी अंधेरीमधल्या सात बंगला परिसरात राहते आणि मुलगा सिंगापूरमध्ये नोकरी करतो.

बिरबल यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘शोले’ या चित्रपटातील अर्धवट मिशा असलेल्या कैद्याची त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सत्येंद्र हे नाव चित्रपटसृष्टीला साजेसं नाही असं वाटल्याने ‘अनिता’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मनोज कुमार आणि दिग्दर्शक राज खोसला यांनी त्यांना ‘बिरबल’ असं नाव दिलं होतं, असं म्हटलं जातं. त्यांनी मनोज कुमार यांच्यासोबत ‘उपकार’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘क्रांती’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर ‘अमीर गरीब’, ‘रास्ते का पत्थर’, ‘सुन मेरी लैला’, ‘अनिता’, ‘इन्सान’, ‘चोरी मेरा काम’ अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची विशेष छाप सोडली.