नेहमी शांत, संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत ‘त्या’ प्रश्नावर भडकली; पहा व्हिडीओ

| Updated on: Dec 19, 2024 | 10:54 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एका मुलाखतीतला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका प्रश्नावरून श्रद्धा मुलाखतकर्त्यावर भडकल्याचं दिसून येत आहे. श्रद्धाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला होता.

नेहमी शांत, संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत त्या प्रश्नावर भडकली; पहा व्हिडीओ
Shraddha Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या गोड आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांशी संवाद साधताना असतो, कार्यक्रमांमध्ये किंवा एअरपोर्टवर चाहत्यांशी संवाद साधताना असो किंवा मग पापाराझींशी बोलताना असतो.. श्रद्धा नेहमीच शांत आणि संयमी वागताना दिसते. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत एका प्रश्नावरून तिचा पारा चढला. श्रद्धाच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकरी संबंधित मुलाखतकर्त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. मुलाखतकर्त्याने श्रद्धाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर तिच्या संयमाचा बांध सुटल्याचं पहायला मिळालं.

श्रद्धा कपूरने शनिवारी ‘आज तक’च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मुलाखत घेणाऱ्याने श्रद्धाला तिच्या डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारला. “आम्ही कार्तिक आर्यनला विचारलं की त्याला कोणत्या हिरोइनला डेट करायला आवडेल आणि त्याला चार पर्याय देण्यात आले. त्यात तुझंही नाव होतं. पण कार्तिकने सांगितलं की चारही अभिनेत्री दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहेत. त्याने याचा खुलासा केला आहे. तर हे खरंय का?”, असा प्रश्न श्रद्धाला विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच श्रद्धा उपरोधिकपणे म्हणते, “ओके, त्याला जे म्हणायचं होतं तो ते म्हणाला. तुमच्याकडे इथे माझ्यासाठी काही प्रश्न आहेत का?” तिच्या अशा प्रतिक्रियेनंतरही मुलाखतकर्ता तिला डेटिंग लाइफबद्दल प्रश्न विचारतो. तेव्हा श्रद्धा वैतागते आणि त्यालाच प्रतिप्रश्न करते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसून येतो.

हे सुद्धा वाचा

श्रद्धा सहसा तिच्या खासगी आयुष्याविषयी सहसा मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु काही महिन्यांपूर्वी पटकथालेखक राहुल मोदीसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. याविषयी एका मुलाखतीत श्रद्धाने तिचं रिलेशनशिप ‘कन्फर्म’ केलं होतं. ‘कॉस्मोपॉलिटन’ला दिलेल्या या मुलाखतीत श्रद्धाने म्हटलं होतं की तिला तिच्या पार्टनरसोबत एकत्र वेळ घालवायला खूप आवडतं. त्याच्यासोबत चित्रपट बघायला, एकत्र डिनर करायला किंवा फिरायला तिला खूप आवडतं. या मुलाखतीच्या काही दिवसांनंतर श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या पोस्टमध्ये तिने कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीला टॅग केलं होतं. हे दोघं ‘वडापाव डेट’वर गेल्याचं फोटोवरून स्पष्ट झालं होतं.