मुंबई: आफताब पूनावाला याने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा गुन्हा पोलिसांसमोर कबुल केला. मात्र या प्रकरणाचा उलगडा अद्याप होत नाहीये. आफताब आणि श्रद्धा हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच वर्षी दोघं दिल्लीला राहायला गेले होते. मेहरौली परिसरात त्यांनी फ्लॅट घेतला होता. मात्र या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. 18 मे रोजी जेव्हा लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये भांडण झालं, तेव्हा आफताबने श्रद्धाची हत्याच केली. हत्येनंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे गेले आणि ते जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले. याचप्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे.
टीव्ही अभिनेता इमरान नाजिर याने या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर ही इमरानची मैत्रीण होती. श्रद्धाने आफताबच्या व्यसनाविषयी सांगितल्याचा दावा इमरानने केला आहे. “आफताबला ड्रग्जचं व्यसन आहे आणि हे व्यसन मला सोडवायचं आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो ड्रग्जचं व्यसन करतोय”, असं श्रद्धाने सांगितल्याचं इमरानने म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून इमरान काश्मीरमध्ये होता. सोमवारी जेव्हा तो मुंबईत परतला तेव्हा श्रद्धा वालकरच्या मृत्यूची बातमी वाचून त्याला धक्काच बसला. एका मुलाखतीत इमरान म्हणाला, “मी श्रद्धाला ओळखतो. फेब्रुवारी 2021 मध्ये तिने मला सांगितलं होतं की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तिचा बॉयफ्रेंड ड्रग ॲडिक्ट आहे आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो ड्रग्ज घेतोय, असं ती म्हणाली होती. आफताबचं व्यसन सोडवण्यासाठी तिने माझ्याकडून रिहॅब सेंटरची माहिती घेतली होती.”
श्रद्धाला रिहॅब सेंटरची फारशी माहिती नसल्याने तिने इमरानकडे मदत मागितली होती. इमरानने अनेक तरुणांना ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडण्यास मदत केली आहे. इमरानने श्रद्धालाही मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दिल्लीला गेल्यानंतर तिने कधीच संपर्क साधला नसल्याचं, इमरानने यावेळी स्पष्ट केलं.
इमरानने आजवर अनेक लोकप्रिय शोजमध्ये हजेरी लावली आहे. ‘गठबंधन’, ‘अलादीन: नाम तो सुना होगा’, ‘मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह’, ‘हमारी बहू सिल्क’, ‘मॅडम सर’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. इमरान हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. त्याने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.