सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीसाठी भाजपपासून काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांचे प्रतिनिधी रिंगणात उभे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. श्रेयससोबतच ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनेसुद्धा गेल्या दहा वर्षांत देशाचा बराच विकास झाल्याचं म्हटलंय. “पंतप्रधान मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून देशासाठी काम करत आहेत आणि ते सर्वांत आधी देशाचा विचार करतात, म्हणून लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं श्रेयस म्हणाला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणूक जिंकतील आणि पुन्हा देशाचा पंतप्रधान होतील, असाही विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या या मुलाखतीत श्रेयस पुढे म्हणाला, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खूप कौतुक करतो. कारण गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या देशासाठी काम करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. म्हणूनच लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आताच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हेच निवडणूक जिंकतील आणि पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसतील.”
श्रेयस तळपदेला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. याविषयी तो म्हणाला, “मी या थिअरीला नकार देणार नाही की कोविड 19 विरोधातील व्हॅक्सीन घेतल्यानंतर मला थकवा जाणवत होता. व्हॅक्सीनचा काही प्रमाणात शरीरावर परिणाम झाला असेल. आपल्याला माहितच नाही की आपल्या शरीरात काय गेलंय. आपण त्या प्रवाहात वाहत गेलो आणि कंपन्यांवर विश्वास केला. कोविड 19 च्या आधी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या.”
दुसरीकडे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, “दोन तासांचा प्रवास आता फक्त वीस मिनिटांत केला जाऊ शकतो. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हे शक्य होईल, याचा विचार तरी कोणी केला होता? आज नवी मुंबई ते मुंबईपर्यंत, गोवा ते मुंबईपर्यंत आणि बेंगळुरू ते मुंबईपर्यंतचा प्रवास खूप सोपा झाला आहे. याचं मला फार कौतुक वाटतं. गेल्या दहा वर्षांत या देशाचा खूप विकास झाला.”