सोमवारी दुपारपासून अभिनेता श्रेयस तळपदेच्या निधनाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. हे वाचून अनेकांना मोठा धक्काच बसला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात श्रेयसला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली होती. आता अचानक त्याच्या निधनाचे मेसेज वाचून सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर श्रेयसने मौन सोडलं आहे. अशा खोट्या बातम्या किंवा मेसेज पसरवणाऱ्यांवर तो भडकला आहे. त्याचप्रमाणे अशा गंभीर अफवा पसरवू नका, अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे. “मी जिवंत, खुश आणि निरोगी आहे”, असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर ही भलीमोठी पोस्ट लिहित तो अफवांवर व्यक्त झाला आहे.
‘मी सर्वांना ही खात्री देऊ इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. माझ्या निधनाची व्हायरल पोस्ट मी पाहिली होती. विनोदाची आपली एक स्वतंत्र जागा असते हे मी समजू शकतो, पण त्याचा गैरवापर केला तर खरंच मोठं नुकसान होऊ शकतं. एखाद्याने विनोद म्हणून हा मेसेज पसरवला असेल, पण त्यामुळे विनाकारण चिंता निर्माण होत आहे. ज्या लोकांना माझी काळजी वाटते, खासकरून माझ्या कुटुंबीयांना.. त्यांच्या भावनांशी खेळू नका. माझी लहान मुलगी, जी दररोज शाळेत जाते आणि ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त करत असते. ती सतत मला माझ्या तब्येतीविषयी प्रश्न विचारते आणि मी ठीक आहे का बघते. अशा खोट्या बातमीमुळे तिच्यातील भीती आणखी वाढते. तिच्या मित्रमैत्रिणींकडून, शिक्षकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना तिला सामोरं जावं लागतं. एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वकाही सावरण्याचा प्रयत्न करत असताना अशा गोष्टींनी आणखी चिंता निर्माण होते’, असं त्याने लिहिलंय.
यापुढे त्याने म्हटलंय, ‘जे लोक अशा बातम्या पुढे पाठवत आहेत, त्यांना मी क्षणभर थांबून त्याच्या परिणामांचा विचार करण्यास सांगतो. अनेकांनी प्रामाणिकपणे माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. एखाद्याच्या भावना अशा पद्धतीने दुखावण्यासाठी विनोदाचा केलेला वापर पाहून मी खरंच खूप निराश झालोय. या अफवांमुळे माझ्या प्रिय व्यक्तींमध्ये चिंता निर्माण होऊ शकते आणि आमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही अफवा पसरवता, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबीयांवर आणि खासकरून मुलांवर होतो. ते संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीतही नसतात पण उगाच अफवांमुळे त्यांना बरंच काही सहन करावं लागतं.’
‘या काळात ज्या लोकांनी माझी विचारपूस केली, त्यांचा मी आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेम हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. ट्रोलर्सना माझी साधी विनंती आहे की कृपया थांबा. इतकांच्या जीवावर विनोद करू नका आणि इतर कोणासोबतच असं करू नका. तुमच्यासोबत असं काही घडावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे कृपया थोडे संवेदनशील व्हा. एंगेजमेंट आणि लाइक्स हे इतरांच्या भावनांच्या जीवावर मिळू शकत नाहीत’, अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.