दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतोय. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा तब्बल 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाचं इतरही काही भाषांमध्ये डबिंग झालंय. त्यापैकी हिंदी भाषेत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पाराज’ या भूमिकेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागासाठीही श्रेयसनेच डबिंग केलं होतं. आता सीक्वेलला प्रेक्षकांकडून मिळणारा जबरदस्त प्रतिसाह पाहून त्याने आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्याचसोबत त्याने एक खंतसुद्धा बोलून दाखवली आहे.
‘डीएनए इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, “पुष्पा 2 हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून मला दररोज फोन आणि डीएम (डायरेक्ट मेसेज) येत आहेत. मी खूप खुश आहे आणि मला खरंच निर्मात्यांचे आभार मानायचे आहेत. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा एक भाग बनण्याची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मी भारावलोय.”
श्रेयसने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बऱ्याच दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र ‘पुष्पा’मुळे जगभरात ओळख मिळाल्याचं त्याने मान्य केलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी माझ्या करिअरमध्ये इतके चित्रपट केले आहेत. इक्बाल, डोर, ओम शांती ओम, वेलकम टू सज्जनपूर, गोलमाल 3, हाऊसफुल 2.. पण तरीही या सगळ्यात पुष्पाच अग्रस्थानी आहे. त्यामुळे हा असा पहिला चित्रपट आहे ज्याने मला केवळ देशभरातच नाही तर जगभरात ओळख मिळवून दिली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षकांना ठाऊक आहे की पुष्पा आणि पुष्पा 2 साठी मी डबिंग केली आहे. अशा चित्रपटानंतर जी लोकप्रियता किंवा ओळख मिळते, ते अभूतपूर्व आहे.”
यावेळी श्रेयसने अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी परफेक्ट डबिंग करण्यामागचं गुपितही सांगितलं. “मी जेव्हा त्या भूमिकेसाठी डबिंग करतो, तेव्हा मी स्वत:च ती भूमिका पडद्यावर साकारत असल्याची कल्पना करतो. मला माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अशी भूमिका मिळाली नाही आणि भविष्यातही मला मिळेल की नाही हे माहीत नाही. पण जेव्हा मी पुष्पा राजसाठी डबिंग करतो, तेव्हा मी स्वत:च त्या भूमिकेत असल्याची कल्पना करतो. दमदार डॉयलॉगबाजीसह पॉवरफुल सीन्स करत असल्याची कल्पना करतो. यामुळेच पडद्यावर तो आवाज ऐकताना अधिक प्रभावी वाटतो”, असं श्रेयस म्हणाला.