हृदयविकाराचा झटका नेमका कशामुळे आला? श्रेयस तळपदेनं सांगितलं खरं कारण

| Updated on: Mar 20, 2024 | 12:28 PM

गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला अंधेरीतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अँजियोप्लास्टी झाल्यानंतर काही दिवसांनी श्रेयसला डिस्चार्ज मिळाला.

हृदयविकाराचा झटका नेमका कशामुळे आला? श्रेयस तळपदेनं सांगितलं खरं कारण
Shreyas Talpade
Follow us on

मुंबई : 20 मार्च 2024 | गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रेयसला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस त्या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचसोबत त्याने अभिनेता अक्षय कुमार, दिग्दर्शक अहमद खान यांचेही आभार मानले. कठीण काळात कुटुंबीयांसोबत उभं राहिल्याने श्रेयसने त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

याविषयी श्रेयस म्हणाला, “माझ्या कुटुंबात वडील, काका, काकी, आजोबा या सर्वांना हृदयाशी संबंधित आजार होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा कौटुंबिक इतिहासच आहे. मी माझं शूटिंग पूर्ण करून व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाऊ लागलो होतो, तेव्हाच मला अस्वस्थ वाटत होतं. सेटवर असलेल्यांना हे जाणवलं होतं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही.”

हृदयविकाराचा झटका कशामुळे आला याविषयी सांगताना श्रेयस पुढे म्हणाला, “माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की कोविडनंतर त्यांनी अशा घटनांमध्ये वाढ पाहिली आहे. कारण रक्त घट्ट होऊ लागलं आहे. रक्त घट्ट झाल्याने त्यापासून गुठळी तयार होऊ लागते. माझ्या केसमध्ये शारीरिक थकवा वाढल्याने आणि शरीरावर अधिक ताण आल्याने ती गाठ फुटली. त्यामुळे ब्लॉकेज निर्माण झाले. हा एखाद्या अपघातासारखा होता आणि हे सर्व अचानकच घडलं होतं. पण त्या परिस्थितीतून मला सुखरुप बाहेर काढल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”

हे सुद्धा वाचा

श्रेयस आता शूटिंगवर परतला असला तरी डॉक्टरांनी त्याला सर्वसामान्य सीन्स शूट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो इतक्यात कोणतेही अॅक्शन सीन्स शूट करू शकत नाही. चार किंवा सहा महिन्यांनंतर पूर्वीप्रमाणे सीन्स शूट करू शकेन, असं श्रेयसने स्पष्ट केलं.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसला तातडीने अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. “मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधीच कोणतं फ्रॅक्चरसुद्धा झालं नव्हतं. त्यामुळे असं काही होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला अजिबात गृहित धरू नका. जान है तो जहान है”, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं.