16-17 तास शूटिंग करूनही ‘श्रीमद रामायण’मधील अभिनेत्रीने बारावीत मिळवले इतके टक्के

| Updated on: May 24, 2024 | 9:52 AM

'श्रीमद रामायण' या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैदेही नायरने बारावी बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिवसाचे 16-17 तास शूटिंग करून अभ्यासासाठी फार कमी वेळ मिळत असतानाही तिने चांगले मार्क मिळवले आहेत.

16-17 तास शूटिंग करूनही श्रीमद रामायणमधील अभिनेत्रीने बारावीत मिळवले इतके टक्के
अभिनेत्री वैदेही नायर
Image Credit source: Instagram
Follow us on

नुकताच बारावीचा निकाल लागला आणि यात अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यंदा अनेक कलाकारांनीही बारावीची परीक्षा दिली होती. दररोज अनेक तास शूटिंग करूनही काही कलाकारांनी बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत. यातच ‘श्रीमद रामायण’ या मालिकेतील अभिनेत्रीचाही समावेश आहे. अभिनेत्री वैदेही नायर ही ‘श्रीमद रामायण’ या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारतेय. तिने बारावीत 88 टक्के मार्क मिळवले आहेत. गेल्या वर्षभरापासून ती ‘श्रीमद रामायण’ आणि ‘शिवशक्ती तप त्याग’ या मालिकांसाठी शूटिंग करतेय. दिवसातील 16-17 तास शूटिंग करूनही वैदेहीने बारावीत चांगले गुण मिळवले आहेत, त्यामुळे तिचं कौतुक होत आहे.

सेटवर शूटिंगदरम्यान केला अभ्यास

“अभ्यास आणि शूटिंग या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप आव्हानात्मक होतं. माझं शेड्युल खूप व्यग्र होतं आणि मला वेळेचं व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करावं लागतं. सेटवर थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मी लगेच माझा अभ्यास करू लागायचे. या सगळ्या प्रक्रियेत माझ्या आईने खूप मदत केली. माझ्या मित्रमैत्रिणींकडून नोट्स मिळवून ती मला सेटवर आणून द्यायची. परीक्षेच्या फक्त काही दिवस आधी मला शूटिंगमधून ब्रेक मिळाला होता. बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी माझ्या हातात फक्त 10 ते 15 दिवस होते. या कालावधीत मी थोडाही वेळ वाया न घालवता मन लावून अभ्यास केला. यात माझ्या प्रॉडक्शन टीमने मला समजून घेतलं आणि परीक्षेसाठी त्यांनी वेळ दिला”, असं वैदेहीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

बारावीनंतर पुढे काय?

वैदेहीला दररोज 16 ते 17 तास शूटिंग करावी लागत असे. त्यामुळे अभ्यासासाठी फार कमी वेळ मिळत होता. शूटिंगनंतरही शरीरातील ऊर्जा कायम ठेवून अभ्यास करणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. अशी आव्हानं असतानाही बोर्डाच्या परीक्षेत 88 टक्के गुण मिळवणं काही सोपं नव्हतं, असं ती म्हणाली. या सगळ्या प्रवासात कुटुंबीयांनी आणि आईवडिलांनी मोलाची साथ दिल्याने त्यांच्याबद्दल वैदेहीने कृतज्ञता व्यक्त केली. यापुढे कशामध्ये करिअर करायचा विचार आहे, असा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितलं, “मी फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आहे. फॅशन हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि माझ्या कल्पकतेचा त्यात खूप चांगला वापर होईल असं मला वाटतं.”