मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रियासुद्धा अभिनयविश्वात सक्रिय आहे. श्रियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याविषयी पसरवल्या गेलेल्या अफवांवर मोकळेपणे व्यक्त झाली. सचिन आणि सुप्रिया यांनी तिला दत्तक घेतल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली गेली. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “यात काडीचंही सत्य नाही आणि हे सिद्ध करण्यासाठी मला माझा जन्माचा दाखला दाखवण्याची गरज नाही.” याच मुलाखतीत श्रियाने सांगितलं की तिने तिच्याबद्दल हे सर्वकाही एका लेखात वाचलं होतं. ती दत्तक घेतलेली मुलगी आहे, असं त्यात लिहिलेलं होतं.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, “नाही, मी दत्तक घेतलेली नाही. माझ्या पालकांनी मला दत्तक घेतल्याची बातमी मी कुठेतरी वाचली होती आणि त्यात जराही सत्य नाही. ही अशीही गोष्ट नाही की त्याचं मी स्पष्टीकरण द्यायला हवं. कारण माझं बोलणं सिद्ध करण्यासाठी मी इन्स्टाग्रामवर माझ्या जन्माचा दाखला पोस्ट करणार नाही. पण हो, ही चर्चाच आश्चर्यकारक आहे कारण ते सत्यच नाही.”
मराठी आणि फ्रेंचमध्ये काम केल्यानंतर श्रियाने 2016 मध्ये शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी 2013 मध्ये ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. यात तिने वडील सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केलं होतं. 2015 मध्ये तिच्या ‘उन प्लस उने’ या फ्रेंच चित्रपटाची स्क्रिनिंग टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने स्वरागिनी ‘स्वीटी गुप्ता’ची भूमिका साकारली होती.
2019 मध्ये श्रियाने ‘बिचम हाऊस’ या ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये तिचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. श्रिया लवकरच ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती ‘ताजा खबर’ आणि ‘ब्रोकन न्यूज 2’ या सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्येही काम करणार आहे.