मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेत नुकताच एक आव्हानात्मक प्रसंग शूट करण्यात आला. या सीनमध्ये मांजरीला वाचवण्यासाठी आकाश मंदिराच्या कळसावर चढतो. स्वत:चा जीव धोक्यात घालून तो निरागस प्राण्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो मंदिराच्या कळसावर चढतो खरा, मात्र त्यानंतर त्याला खूप भीती वाटू लागते. तेव्हा भूमी येऊन आकाश आणि मांजरीचा जीव वाचवते. मालिकेतल्या या दृश्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या एका दृश्यासाठी भूमी आणि आकाश 40 फूट उंच मंदिराच्या कळसावर चढले.
अनेकदा चित्रपटांमध्ये असे स्टंट्स सहज शूट केल्याचं आपण पाहतो. मात्र मालिकांमध्ये ती रिस्क सहसा घेतली जात नाही. मात्र शुभविवाह या मालिकेच्या टीमने हे आव्हान स्वीकारत हा धाडसी सीन पूर्ण केला. या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे ही भूमीची तर यशोमान आपटे हा आकाशची भूमिका साकारतोय.
या दोघांनीही कोणत्याही बॉडी डबलचा वापर न करता हा सीन पूर्ण केला. अर्थातच हा सीन शूट करण्यासाठी सर्वतोपरी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती. अवघ्या काही मिनिटांचा हा सीन शूट करण्यासाठी कित्येक तास लागले. दिग्दर्शक आणि फाइट मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सीन पूर्ण करण्यात आला.
यशोमान आणि मधुरा यांनी असा सीन पहिल्यांदाच शूट केला आहे. “सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र टीमच्या सहकार्यामुळ आणि उत्तम नियोजनामुळे हा सीन पूर्ण करता आला”, अशी प्रतिक्रिया मधुरा आणि यशोमानने दिली. शुभविवाह ही मालिका दुपारी 2 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.