अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला होता. त्यामध्ये मोजके कुटुंबीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज आणि शुराला अनेकदा त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. आता वय आणि उंचीतील फरकावरून ट्रोल करणाऱ्यांना शुराने उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. त्यात एका युजरने तिच्या आणि अरबाजमधील वयात, उंचीत किती फरक आहे, असा प्रश्न विचारला आहे. यावर शुराने दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे.
‘तुझ्या आणि तुझा पती अरबाजच्या वयात आणि उंचीत किती फरक आहे’, असा सवाल एका युजरने केला. त्यावर उत्तर देताना शुराने लिहिलं, ‘अरबाजची उंची 5’10 फूट आहे आणि माझी उंची 5’1 फूट इतकी आहे. बाकी वय हा केवळ आकडा आहे.’ यापुढे तिने डोळा मारतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे.
याआधीच्या एका मुलाखतीत अरबाज म्हणाला, “लोकांना याबद्दल आश्चर्य वाटू शकतं, पण लग्नापूर्वी आम्ही वर्षभरापेक्षा अधिक काळ एकमेकांना डेट केलंय. आम्ही आमच्या नात्याबद्दल ठाम होतो. आम्ही दोघं खूप नशीबवान होतो. आम्ही बाहेर कॉफी शॉपवर भेटायचो आणि जेव्हा मी तिला घरी घ्यायला किंवा सोडायचो जायचो, तेव्हा आम्हाला कोणीच पाहायचे नाही. कोणतेच पापाराझी तिचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करत नसल्याचा तिला खूप आनंद होता. आता आम्ही कॉफी शॉपवर जाण्याआधीच तिथे पापाराझी पोहोचलेले असतात.” अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.
शुराशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना अरबाज म्हणाला होता, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही फार एकमेकांशी बोललो नाही. पण शूटिंग संपल्यानंतरच्या पार्टीत आम्ही एकमेकांशी बोलले. त्यानंतर हळूहळू संपर्क वाढला. आमच्यात बरंच काही साम्य आहे. एकमेकांशी भेटून, बोलून आमच्यात प्रेमाची भावना निर्माण झाली. आम्ही दोघं आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर होतो, जिथे आम्हाला पार्टनरसोबत स्थिर व्हायचं होतं. एकमेकांमध्ये अनेक भावना गुंतल्याने अखेर आम्ही पुढील आयुष्य सोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे संपूर्ण आमच्यासाठी ‘झट मंगनी पट ब्याह’ असं होतं.”