मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा व्हॉडकास्ट चांगलाच चर्चेत आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ या तिच्या व्हॉडकास्टचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या नव्या एपिसोडमध्ये नव्याची आई म्हणजेच बिग बींची मुलगी श्वेता बच्चन यांनी वडिलांबद्दल एक खुलासा केला आहे. बिग बींना त्यांच्या घरातील महिलांची किंवा मुलींची एक गोष्ट अजिबात आवडत नसल्याचं श्वेताने सांगितलं. नव्यासोबत गप्पा मारताना श्वेता म्हणाली की, “बाबांना घरातील महिलांचं केस कापणं किंवा छोटे केस ठेवणं अजिबात आवडत नाही. मात्र तरीही त्यांच्या मर्जीविरोधात जाऊन मी नेहमी माझे केस लहान कापायची.”
केस कापण्याचा विषय सुरू असताना श्वेताने तिच्या मुलीला सांगितलं की ती नेहमीच अमिताभ बच्चन यांच्या मर्जीविरोधात जाऊन केस लहान कापायची. यावर नव्या तिला विचारते, “आजोबांना हे आवडायचं नाही ना?” तेव्हा श्वेता सांगते, “त्यांना त्या गोष्टीचा खूप राग यायचा. मी जेव्हा माझे केस कापायची, तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे, हे काय केलंस तू? त्यांना छोटे केस अजिबात आवडायचे नाहीत. त्यांना लांब केसच आवडतात. आमच्यापैकी कोणीच केस कापलेलं त्यांना आवडायचं नाही.”
या मुलाखतीत नव्याने आजी जया बच्चन यांना मॉइस्चराइजरबद्दलही प्रश्न विचारला होता. आजोबांना कोणतं मॉइस्चराइजर आवडतं, असं विचारलं असता जया बच्चन म्हणाल्या, “सरसों का तेल” (राईचं तेल). याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “त्यांची ही खूप युपीची सवय आहे. ते राईच्या तेलालाच अत्यंत गुणकारी मॉइस्चराइजर समजतात. मुलांना राईचं तेलं लावा, असं ते मला सतत सांगायचे. पण त्या तेलाचा वास मला आवडत नाही.” राईच्या तेलाचा विषय निघताच श्वेता तिच्या आई-वडिलांच्या विविध संस्कृतींचा उल्लेख करते. “बंगाली लोक राईच्या तेलात जेवण बनवतात, पण ते शरीराला लावत नाहीत. पण उत्तरप्रदेशचे लोक राईचं तेल शरीराला लावतात”, असं श्वेता सांगते.
अभिनेत्री जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा हे पुन्हा एकदा व्हॉडकास्टनिमित्त एकत्र आले आहेत. या व्हॉडकास्टच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा या अनेक विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. एका सेगमेंटदरम्यान जया बच्चन या लग्न आणि रोमान्स याबद्दल बोलू लागल्या होत्या. “लग्नानंतर रोमान्स उरतच नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या.