श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिच्या मालिकांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने दोन लग्न केले, मात्र दोन्ही लग्न टिकू शकले नाहीत. श्वेताने पहिलं लग्न राजा चौधरीशी केलं होतं. या दोघांना पलक तिवारी ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर पलक ही आई श्वेतासोबतच राहते. मात्र ही गोष्ट फार क्वचित लोकांना माहीत आहे की श्वेताला घटस्फोट देताना त्यांनी मुलगी पलकच्या ऐवजी प्रॉपर्टीला प्राधान्य दिलं होतं. श्वेता आणि राजाचा संसार हा जवळपास नऊ वर्षे टिकला होता. 2007 मध्ये तिने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तर 2012 मध्ये दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेताला घटस्फोटानंतर राजाला तिचा वन बेडरुम अपार्टमेंट द्यावा लागला होता. या अपार्टमेंटची किंमत त्यावेळी जवळपास 93 लाख रुपये इतकी होती. राजा आणि श्वेता हे दोघं या घराचे मालक होते. घटस्फोटाच्या वेळी वकिलाने तो फ्लॅट पलक आणि राजाच्या नावावर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र राजाला हे मान्य नव्हतं. मला एकट्यालाच या फ्लॅटचं मालकत्व हवंय, असं तो म्हणाला होता.
याविषयी श्वेता म्हणाली होती, “राजा जेव्हा असं म्हणाला तेव्हा मला धक्काच बसला होता. मी प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलीचा त्याग करू शकतो, मला फ्लॅट दे आणि मी तुला घटस्फोट देतो, असं तो म्हणाला होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती.” घटस्फोटानंतर श्वेताच्या परवानगीशिवाय राजा त्याच्या मुलीला भेटू शकत नव्हता.
श्वेताला घटस्फोट दिल्यानंतर राजाचं नाव श्रद्धा शर्माशी जोडलं गेलं होतं. श्रद्धाने राजावर आरोप लावले होते की नशेत तो खूप आक्रमक वागतो. दुसरीकडे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राजानेही या गोष्टीचा स्वीकार केला होता की तो व्यसनाधीन झाला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने उपचारसुद्धा घेतले होते.
2021 मध्ये राजा जवळपास 13 वर्षांनंतर त्याच्या मुलीला भेटला होता. या भेटीचा फोटो पोस्ट करत त्याने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या होत्या. “माझ्या आयुष्यातील हा खूप खास क्षण आहे. मी तिला 13 वर्षांनंतर भेटलोय. मी जेव्हा तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती लहान मुलगी होती आणि आता ती खूप मोठी झाली आहे”, असं राजाने लिहिलं होतं.