टीव्ही इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय कलाकारांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचं नाव आवर्जून घेतलं जातं. श्वेताच्या पावलांवर पाऊल टाकत तिची मुलगी पलक तिवारीनेही अभिनयक्षेत्रात पदार्पण केलंय. मात्र पलक तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळेच अनेकदा प्रकाशझोतात येते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पलक ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. मुलीच्या लिंक-अपच्या चर्चांबद्दल श्वेता या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
“मला अफवांमुळे आता काही फरक पडत नाही. कारण इतक्या वर्षांत मला एक गोष्ट समजली ती म्हणजे लोकांची स्मरणशक्ती फक्त चार तासच टिकते. त्यानंतर ते बातमी विसरून जातात, मग कशाला त्रास करून घ्यायचा? या अफवांच्या मते, माझी मुलगी दर तिसऱ्या मुलाला डेट करतेय आणि मी दरवर्षी लग्न करतेय. इंटरनेटच्या मते माझं तीन वेळा लग्न झालंय. त्यामुळे मला आता याने काही फरक पडत नाही. जेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि काही पत्रकांना तुमच्याबद्दल कधीच चांगलं लिहायला आवडत नसायचं, तेव्हा मला फरक पडत होता. कलाकारांविषयी काही नकारात्मक लिहिलं ते खपलं जातं. त्या काळाचा सामना केल्यानंतर आता मला कशानेच फरक पडत नाही”, असं श्वेता म्हणाली.
पलकच्या ट्रोलिंगबद्दल श्वेता पुढे म्हणाली, “आधी प्रेक्षक खूप साधे होते, त्यांना समजावण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नसायचे. पण आता सोशल मीडियाच्या काळात, प्रेक्षक तुमच्यावर दादागिरी करू शकतात. माझ्या मुलीमुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले. ट्रोलिंगचा सामना कसा करायचा, हे आधी माझी मुलगी शिकली. माझ्या वेळी सोशल मीडियाची इतकी क्रेझ नव्हती. त्यामुळे ट्रोलर्सचा सामना कसा करायचा, हे मला माहीत नव्हतं. पण आता पलक ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळतेय, ते पाहून मला बरंच शिकायला मिळतंय.”
“मला कधीकधी त्याची भीतीसुद्धा वाटते. पलक कशीही दिसत असली तरी ती खूप निरागस आहे. ती कधीच लोकांना सुनावू शकत नाही. सध्याचा ट्रोलिंगचा जमाना खूप वाईट आहे. ती स्ट्राँग असली तरी त्याचा परिणाम तिच्यावर झाला तर काय, तिचा आत्मविश्वास खचला तर काय, याची मला भीती वाटते. लोकांनी तसे प्रयत्नसुद्धा केले आहेत. पण ती कमेंट्स वाचत नाही. पण कधी कोणती गोष्ट दुखावेल हे सांगता येत नाही. तिला जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं”. अशा शब्दांत श्वेता व्यक्त झाली.