अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो सिद्धार्थ आणि मिताली मयेकरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या,' असं सिद्धार्थने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
'किती सुना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास,' अशा शब्दांत मिताली मयेकरने भावना व्यक्त केल्या आहेत.
'आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा,' असंही मितालीने म्हटलंय.
सीमा चांदेकर यांच्यावर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर हे पाऊल उचलण्यासाठी आईला मदत केल्याबद्दल सिद्धार्थचंही कौतुक होत आहे.