जैसलमेर: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जैसलमेरमधल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागल्याने सोशल मीडियावर कोणतेच फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत. मात्र मंगळवारी रात्री कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ही जोडी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थला आज (8 फेब्रुवारी) जैसलमेर एअरपोर्टवर पाहिलं गेलं. हे दोघं जैसलमेरहून दिल्लीसाठी रवाना होत होते.
यावेळी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि त्यावर काळ्या रंगाचा जॅकेट असा सिद्धार्थचा कॅज्युअल लूक होता. तर कियाराने काळ्या रंगाची पँट त्यावर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाचा शॉल घेतला होता. कियाराच्या भांगेतील सिंदूर, हातातील चुडा आणि गळ्यातील मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं.
सिद्धार्थ-कियाराचा हा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला. त्यातही कियाराने सिंदूर, चुडा आणि मंगळसूत्र घातल्याने काहींनी तिचं कौतुक केलं. विराट-अनुष्कानंतर सिद्धार्थ-कियाराची जोडी सर्वाधिक आवडल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर काहींचं लक्ष कियाराच्या स्कार्फकडेही वेधलं गेलं. जैसलमेरला जातानाही कियाराने गुलाबी रंगाचा स्कार्फ अंगावर ओढला होता. त्यानंतर आता पुन्हा तिला स्कार्फमध्ये पाहिलं गेलं.
सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.
2010 मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. तर कियारा अडवाणीने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये किंवा सहलींवर जाताना दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलं.
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही”, असं ती म्हणाली होती.