पंजाब : 20 मार्च 2024 | दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण त्याची आई चरणकौर सिंह यांनी वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. IVF म्हणजेच विट्रो फर्टिलायजेशनच्या मदतीने चरणकौर या आई बनू शकल्या. बाळाच्या जन्मानंतर आता बलकौर सिंह यांनी पंजाबच्या भरवंत मान सरकारवर आरोप केले आहेत. नवजात शिशूच्या जन्मापासूनच कुटुंबीयांना सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप मूसेवालाच्या वडिलांनी केला आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत बलकौर सिंह म्हणाले, “आम्हाला प्रशासनाकडून खूप त्रास दिला जातोय. सतत आम्हाला बाळाविषयीची कागदपत्रं दाखवण्यास सांगितलं जात आहे. हे बाळ कायदेशीर असल्याचं सिद्ध करा, असं म्हणत ते मला विविध प्रश्न विचारत आहेत. मी सरकारला आणि खासकरून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी याप्रकरणी मला थोडं समजून घ्यावं. किमान बाळाचे उपचार तरी पूर्ण होऊ द्या. मी इथलाच राहणारा आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही मला जेव्हा कधी बोलवणार तेव्हा मी तुमच्यासमोर हजर राहणार आहे. पण या सततच्या प्रश्नांमुळे मी त्रासलो गेलो आहे. मी जीव देऊ शकतो पण मागे हटू शकत नाही. जोवर कायदेशीर बाबींचा प्रश्न आहे, तर माझ्या मुलाने 28 वर्षांपर्यंत कायद्याचा आदर केला आहे. मीसुद्धा तितकाच आदर करतो.”
“मी कधीच कायद्याचं उल्लंघन करणार नाही. पण जर तुम्हाला अशी शंका असेल तर थेट एफआयआर दाखल करून मला तुरुंगात टाका. नंतर चौकशी करत बसा. मी लवकरच तुमच्यासमोर कागदपत्रं सादर करेन”, असंही ते पुढे म्हणाले. सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये बलकौर सिंह यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना सांगितलं की, मुलाच्या जन्मावरून त्यांना त्रास दिला जातोय. पत्नीच्या उपचारानंतर बाळाविषयीचे सर्व कागदपत्रं सादर केले जातील. IVF द्वारे बाळाला जन्म देतानाही सर्व कायदेशीर प्रक्रियांचं पालन करण्यात आलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.