मुंबई : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाने त्याच्या दमदार गायनकौशल्याने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. आज तो या जगात नसला तरी एकापेक्षा एक हिट गाण्यांमुळे चाहते त्याची आठवण काढतात. नुकतंच त्याचं ‘मेरा ना’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. गेल्या वर्षी 29 मे रोजी सिद्धूला गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. सिद्धूची प्रदर्शित न झालेली गाणी त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडून चाहत्यांच्या भेटीला आणली जात आहेत. ‘मेरे ना’ हे त्याचं नवीन गाणं स्टील बँग्लेज आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता बर्ना बॉयसोबत आहे. या गाण्याला अवघ्या काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
‘मेरे ना’ या गाण्यासोबतच त्याचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धूच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. सिद्धूच्या या नवीन गाण्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे. अवघ्या 16 मिनिटांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. पुढीत सात – आठ वर्षे सिद्धूची गाणी प्रदर्शित करत राहणार असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलंय.
राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 27 वर्षीय मूसेवालाचा मृत्यू झाला. सिद्धू त्याच्या जीपमधून जात असताना अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.
सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या मृत्यूनंतर आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. ‘एसवायएल’ या गाण्याने अनेक विक्रम मोडले होते. तो राजकारणातही सक्रिय होता. सिद्धूने मानसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ‘आप’चे डॉ. विजय सिंगचा त्याने पराभव केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी मूसेवालाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
सिद्धूचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मृत्यूनंतरही चाहत्यांकडून त्याच्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. सिद्धूचं नवीन गाणं ऐकून काही चाहते भावूकसुद्धा झाले आहेत. या गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी भावूक प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. ‘लेजंड्स कधीच मरत नाहीत’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मिस यू ब्रो. तू नेहमीच टॉपवर राहशील’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘लेजंड्स तोपर्यंत मरत नाहीत, जोपर्यंत त्यांना विसरलं जात नाही’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.