Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवालाचं शेवटचं SYL गाणं युट्यूबवरून काढलं; गाण्यातून मांडला होता पंजाबचा महत्त्वाचा वाद

| Updated on: Jun 27, 2022 | 10:02 AM

सिद्धूच्या या शेवटच्या गाण्याने 27 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले होते. तर तीन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले होते. या म्युझिक व्हिडिओमध्ये अनेक अतिरेक्यांचे फोटो दाखवण्यात आले होत, ज्यात बलविंदर सिंग जटाना याचाही समावेश होता.

Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवालाचं शेवटचं SYL गाणं युट्यूबवरून काढलं; गाण्यातून मांडला होता पंजाबचा महत्त्वाचा वाद
Sidhu Moose Wala
Image Credit source: Youtube
Follow us on

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येनंतर त्याचं शेवटचं गाणं काही दिवसांपूर्वी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. पंजाबच्या पाणी प्रश्नावरचं ‘SYL’ हे गाणं आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आलं आहे. SYL म्हणजे सतलज-यमुना लिंक (Sutlej-Yamuna Link) कालव्यावरून या गाण्याला शीर्षक देण्यात आलं होतं. सिद्धूच्या या शेवटच्या गाण्याने 27 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले होते. तर तीन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले होते. सिद्धूने त्याच्या मृत्यूपूर्वी हे गाणं लिहिलं आणि संगीतबद्ध केलं होतं. संगीत निर्माता MXRCI ने 23 जून रोजी युट्यूबवर हे गाणं प्रदर्शित केलं होतं. मात्र आता त्या लिंकवर क्लिक केलं असता ‘हा व्हिडिओ उपलब्ध नाही’ असा मेसेज दिसतो. ‘सरकारी कायदेशीर तक्रारीमुळे हा व्हिडीओ डोमेनवर उपलब्ध नाही’, असा संदेश त्यापुढे दिसून येतो.

सतलज-यमुना लिंकचा वाद

214 किलोमीटर लांबीचा सतलज-युमना लिंक कालवा हा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून पंजाब (Punjab) आणि हरयाणा यांच्यातील वादाचा मुद्दा आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये अनेक अतिरेक्यांचे फोटो दाखवण्यात आले होत, ज्यात बलविंदर सिंग जटाना याचाही समावेश होता. बलविंदर हा खलिस्तान समर्थक बब्बर खालसाचा सदस्य होता आणि त्याच्यावर मुख्य अभियंता एम. एल. सिक्री आणि अधीक्षक अभियंता ए. एस. औलख यांची चंदीगडमधल्या SYL ऑफिसजवळ हत्या केल्याचा आरोप होता. रावी-बियास नदीच्या पाण्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी पंजाब करत आहे, तर हरियाणा आपला हिस्सा मिळविण्यासाठी कालवा पूर्ण करण्याची मागणी करत आहे.

29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने त्याची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या कॅनडास्थित गोल्डी ब्रारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

हे सुद्धा वाचा

पंजाब पोलिसांनी अँटी-गँगस्टर टास्क फोर्सच्या (एजीटीएफ) प्रमुखांच्या देखरेखीखाली हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. दिल्ली पोलिसांनी नुकतंच या हत्येतील दोन मुख्य शूटर्सना अटक केली. प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी शूटर्सची नावं आहेत. पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जप्त केला आहे.