मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध गायक आदित्य नारायण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आदित्यवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. छत्तीसगडमधील एका कॉन्सर्टमध्ये आदित्यने चाहत्याशी गैरवर्तन करत त्याचा फोन खेचला आणि फेकून दिला. त्याच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि आदित्यवर चहूबाजूने टीकेचा भडीमार होऊ लागला.
स्टेजवर गाणं गात असताना आदित्य अचानक एका चाहत्याजवळ गेला. आधी माईकने त्याने चाहत्याच्या हातावर मारलं आणि त्यानंतर त्याचा मोबाइल घेऊन दूर फेकून दिला. असं त्या व्हिडीओत दिसलं. या सगळ्यामुळे मोठा गदारोळ माजला. मात्र त्यानंतर आदित्य काही बोलला नव्हता. अखेर आता त्याने या सगळ्या गदारोळावर पहिल्यांदाच मौन सोडलं असून प्रतिक्रिया दिली आहे.
मी फक्त देवाला उत्तर देईन
तुझं यावर काय म्हणणं आहे ? असा प्रश्न या सगळ्या प्रकाराबद्दल आदित्यला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर आदित्यने कोणतही स्पष्टीकरण देण्याऐवजी स्पष्ट उत्तर दिल. ‘ खरं सांगू तर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी फक्त देवाला याचं उत्तर देईन’ असं आदित्य म्हणाला.
काय आहे प्रकरण ?
छत्तीसगडच्या भिलाईमधील रुंगटा आर 2 कॉलेजमध्ये आदित्य नारायण याची कॉन्सर्ट होती. तेथे स्टेजजवळ उभ्या असलेल्या एका चाहत्याला आदित्यच्या रागाचा फटका बसला. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आदित्यने त्या चाहत्याचा फोन खेचून तो दूर फेकून दिल्याचे दिसले. मात्र त्याचं हे वागण कोणालाच आवडलं नाही. त्याच्यावर चहूबाजूने टीका होऊ लागली.
मात्र त्यानंतर आदित्यचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या आयोजकांनी नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती दिली आहे. आदित्य स्टेजवर परफॉर्म करताना स्टेजच्या कडेलाच असलेले काहीजण त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने फोन फेकून दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“तो मुलगा सतत आदित्यचा पाय खेचत होता. म्हणून वैतागून आदित्यने तसं केलं होतं. एवढंच नव्हे तर त्याने आदित्यच्या पायावर अनेकदा मोबाइल आपटला होता. अशा परिस्थितीमध्ये कोणालाही राग येणं स्वाभाविक आहे. या घटनेनंतरही आदित्यने व्यवस्थित परफॉर्म केलं आणि इतर विद्यार्थ्यांसोबत बरेच सेल्फी काढले ” असं इव्हेंट मॅनेजरने स्पष्ट केलं.
यापूर्वीही आदित्य नारायणने केला होता अपमान
सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे वागण्याची आदित्य नारायणची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये आदित्यचा रायपूर एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो एअरपोर्ट सिक्युरिटी स्टाफला धमकावताना दिसला होता. “जर मी तुझा अपमान केला नाही तर माझंही नाव आदित्य नारायण नाही”, असं तो म्हणाला होता.