बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायलेल्या गायिका अल्का याज्ञिक यांच्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अल्का यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची समस्या असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालंय. अल्का यांची ही पोस्ट वाचून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा त्या विमानातून बाहेर पडल्या, तेव्हा अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं होतं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या दुर्मिळ समस्येचं निदान झालं. व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले. मात्र अल्का यांची पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या मनात सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसविषयी विविध प्रश्न उपस्थित झाले. हे कशामुळे होतं, त्याची लक्षणे काय असतात आणि ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी.. याविषयीची माहिती जाणून घेऊयात..
कानाच्या आतील बाजूला किंवा कानापासून मेंदूपर्यंत ध्वनी प्रसारित करणाऱ्या मज्जातंतूंना झालेल्या हानीमुळे श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. यालाच सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस (rare sensorineural nerve hearing loss) असं म्हणतात. याला दुर्मिळ यामुळे म्हटलं जातं कारण श्रवणशक्ती कमी होणाऱ्या सर्व प्रकरणांपैकी हे फक्त 5 ते 15 टक्क्यांमध्ये आहे.
सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस होण्याची बरीच संभाव्य कारणं आहेत. त्यापैकी काही जन्मापासूनच असू शकतात. तर काही अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान झालेल्या गुंतागुंतांमुळेही ही समस्या होऊ शकते. याव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही अशा प्रकारचं हिअरिंग लॉस होऊ शकतं. यामध्ये पुढील कारणांचा समावेश असू शकतो..
सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात. काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात..
– इतरांचं बोलणं समजण्यात अडचण
– भुनभुनणारा किंवा घुमणारा आवाज
– कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं, गुंजणं किंवा हिसक्याचा आवाज
– मोठा आवाज ऐकण्यात अडचण
– संतुलनात समस्या
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास, योग्य निदान आणि उपचारासाठी ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
दुर्दैवाने, सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस हे सर्वसामान्यपणे कायम स्वरुपाचं असतं आणि ते पूर्ववत केलं जाऊ शकत नाही. मात्र, जाणवणाऱ्या लक्षणांसाठी आणि ही समस्या असलेल्यांचं आयुष्य थोडंफार सुकर करण्यासाठी अनेक उपचारांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये औषधोपचार, कॉक्लिअर इम्प्लांट, श्रवण यंत्र आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणं यांचा समावेश आहे.