गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी स्पीकरवर वाजवल्या जाणाऱ्या अजानविषयी (Azan on Speaker) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. मुस्लिमबहुल देशात जर स्पीकरवर अजान वाजवली जात नसेल तर भारतात हे असं का, असा सवाल पौडवाल यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. याआधी 2017 मध्ये गायक सोनू निगमनेही (Sonu Nigam) लाऊड स्पीकरवर वाजवल्या जाणाऱ्या अजानवर आक्षेप घेतला होता. पहाटेच सोनू निगमने याविषयी बरेच ट्विट्स केले होते. हे प्रकरण तेव्हासुद्धा तापलं होतं. आता पुन्हा एकदा स्पीकरवर अजान वाजवली जावी की नाही, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “मी जगात अनेक ठिकाणी फिरले. पण आपल्या भारतात जे होतं, तसं घडताना मी इतर कुठेही पाहिलेलं नाही. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मात्र आपल्याकडे जबरदस्तीने या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातंय. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांनाही असं वाटतं की आम्हीसुद्धा असं का करू नये.”
इतर देशांचं उदाहरण देत त्या पुढे म्हणाल्या, “मी आखाती देशांमध्ये प्रवास केला. तिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाऊडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं? अजानप्रमाणेच देशातील इतरांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली तर त्यातून वाद आणखी चिघळेल. हे सगळं पाहून दु:ख होतं.”
अनुराधा यांनी नवरात्री आणि रामनवमी यांविषयीही आपलं मत मांडलं. “आपल्या मुलांना देशाच्या संस्कृतीबद्दल जागरूक केलं पाहिजे. आदि शंकराचार्य आपले धर्मगुरू आहेत, हे त्यांना माहित असायला हवं. हिंदूंकडे चार वेद, 18 पुराण आणि चार मठ आहेत, याचीही माहिती त्यांनी असायला हवी”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा:
Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी