कर्नाटकात (Karnatak) हिजाबबंदीवरील वादानंतर आता हलाल मांसावर बंदी (halal row) आणण्याची मागणी होत आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते घरोघरी जाऊन हलाल मांसावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आहेत. किराणा सामान आणि मांसाची खरेदी ही केवळ हिंदू विक्रेत्यांकडून करावी, असं ते लोकांना सांगत आहेत. याप्रकरणी हिंसाचार घडविल्याप्रकरणी बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हलाल मांस उत्पादनांवर बंदीची मागणी करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये घुसून तिथल्या कामगारांवर हल्ला केला. या हलाल मांसाच्या वादावर प्रसिद्ध गायक लकी अलीने (Lucky Ali) फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘जर लोकांना ‘हलाल’ या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर त्यांनी ते काढून टाकावं,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
‘प्रिय भारतीय बंधू-भगिनींनो, मला आशा आहे की तुम्ही ठीक असाल. मला तुम्हाला काहीतरी समजावून सांगायचं आहे. ‘हलाल’ निश्चितपणे इस्लाम व्यतिरिक्त कोणासाठीही नाही. ज्यू नातेवाईक हलालला कोशेरसारखेच समजतात आणि जोपर्यंत उत्पादनातील घटक त्यांच्या वापरण्यायोग्य मर्यादेनुसार असल्याचं प्रमाणित होत नाही तोपर्यंत ते कोणतंही उत्पादन खरेदी करत नाहीत. मुस्लिमांच्या बाबतीतसुद्धा असंच आहे. आता कंपन्या मुस्लिम आणि ज्यू लोकांसह सर्वांना हलाल विकू इच्छितात. हे विकण्यासाठी त्यांना हलाल प्रमाणित किंवा कोशेर प्रमाणित असा लेबल लावावा लागतो. अन्यथा मुस्लिम आणि ज्यू त्यांच्याकडून ते खरेदी करणार नाहीत. परंतु जर लोकांना ‘हलाल’ या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर त्यांनी काऊंटरवरून ते काढून टाकावं. परंतु त्याची विक्री पूर्वीसारखीच होईल की नाही हे कोणी सांगू शकत नाही,’ अशी पोस्ट लकी अली यांनी लिहिली आहे. ‘प्रेमाने आणि समजुतदारपणे..’ असं त्यांनी या पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे.
भाजपचे सी.टी. रवी यांनी ट्विटरवर हलाल मांसविरोधातील एक पोस्ट लिहिली होती. “यापुढे हिंदूंसाठी हलाल उत्पादनं नाहीत. या आर्थिक जिहादच्या विरोधात एकजुटीने लढुयात,” असं त्यांनी त्यांनी लिहिले होतं. या वादानंतरच लकी अलीने फेसबुकवर ही पोस्ट लिहिली.
लकी अली यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी त्यांना या वादात न पडण्याचा सल्ला दिला. तर काहींनी त्यांचं समर्थन केलं. दरम्यान हलाल मांसाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हिंदुत्ववादी नेते प्रशांत संबार्जी आणि पुनीत करेहल्ली यांनी बेंगळुरूच्या चामराजपेठ परिसरात हलालबंदीसाठी पत्रकं वाटली.
हेही वाचा:
‘नाहीतर लोक मला जोड्याने मारतील’, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती
Bigg Boss 15 फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत करणार काम