Singer Shubh | भारतातील कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर गायक शुभचं स्पष्टीकरण; नकाशाबद्दल म्हणाला ‘हा माझाही देश’

| Updated on: Sep 22, 2023 | 10:41 AM

गायक शुभनीत सिंगच्या एका पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर त्याला विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि केएल राहुलने अनफॉलो केलं होतं. आता त्याचा भारतातील दौरा रद्द करण्यात आला आहे. शुभचे भारतातील कॉन्सर्ट रद्द केल्यानंतर त्याने पोस्ट लिहिली आहे.

Singer Shubh | भारतातील कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर गायक शुभचं स्पष्टीकरण; नकाशाबद्दल म्हणाला हा माझाही देश
Singer Shubh
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंग ऊर्फ शुभचे भारतातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहेत. खलिस्तानला पाठिंबा दिल्याच्या आरोपानंतर त्याचा भारतातील हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यावर शुभने नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने ‘अत्यंत निराश’ झाल्याचं म्हटलं आहे. आपल्या देशात परफॉर्म करण्यासाठी मी फार उत्सुक होतो, असंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर शुभविरोधात जोरदार बहिष्काराची मागणी होऊ लागल्यानंतर बुधवारी ‘बुक माय शो’ या तिकिट बुकिंग अॅपने त्याचा दौरा रद्द केला. जानेवारी महिन्यात शुभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भारताचा नकाशा शेअर केला होता. या नकाशामध्ये पंजाब, काश्मीर आणि ईशान्य भाग भारतात नव्हता. त्याचसोबत ‘पंजाबसाठी प्रार्थना’ असं कॅप्शन त्याने दिलं होतं.

शुभच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या टीकेनंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली आणि कोणत्याही फोटोशिवाय ‘पंजाबसाठी प्रार्थना’ असा मेसेज लिहिला. आता स्पष्टीकरण देताना शुभने काहीच चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे. ‘पंजाबमध्ये वीज आणि इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या वृत्तानंतर मी फक्त पंजाबसाठी प्रार्थना करण्यासाठी नकाशा शेअर केला होता’, अशी सारवासारव त्याने केली आहे.

हे सुद्धा वाचा

शुभचं स्पष्टीकरण-

‘माझ्या स्टोरीवर ती पोस्ट पुन्हा शेअर करण्याचा माझा हेतू हा फक्त पंजाबसाठी प्रार्थना करण्याचा होता. कारण संपूर्ण राज्यात वीज आणि इंटरनेट सेवा बंद असल्याचं वृत्त होत. त्या पोस्टमागे दुसरा कोणताही विचार नव्हता आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू निश्चितच नव्हता’, असं त्याने लिहिलं आहे. भारतातील कॉन्सर्ट रद्द केल्यामुळे अत्यंत दु:खी असल्याचं म्हणत त्याने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘गेल्या दोन महिन्यांपासून मी या दौऱ्यासाठी तयारी करत होतो. भारत हा माझासुद्धा देश आहे. इथेच माझा जन्म झाला. ही माझ्या गुरुंची आणि पूर्वजांची भूमी आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे त्याग करण्याआधी त्यांनी जराही विचार केला नव्हता. पंजाब हा माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. आज मी जो काही आहे, ते पंजाबी असल्यामुळेच आहे. पंजाबींना देशभक्तीचा पुरावा द्यावा लागत नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजाबींनी आपल्या प्राणाचा त्याग केला आहे. त्यामुळे प्रत्येक पंजाबीला फुटीरतावादी आणि देशद्रोही असल्याचं म्हणणं टाळा.’

शुभच्या वादानंतर क्रिकेटपटू विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर गायक शुभचा हा वाद समोर आला. जूनमध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा सहभाग होता असा आरोप कॅनडाने केला होता. त्यानंतर त्यांनी ओटावा इथल्या नवी दिल्लीच्या गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी केली होती. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी कटू झाले.