ऐश्वर्या रायबद्दल ‘ते’ वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींवर भडकली गायिका; म्हणाली ‘तुमच्या आई-बहिणींचा अपमान..’

| Updated on: Feb 22, 2024 | 3:47 PM

राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाषणात चार वेळा अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोदींवर टीका करताना ते अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याबद्दल असं काही म्हणाले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

ऐश्वर्या रायबद्दल ते वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींवर भडकली गायिका; म्हणाली तुमच्या आई-बहिणींचा अपमान..
सोना मोहपात्रा, ऐश्वर्या राय, राहुल गांधी
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाषणात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचा उल्लेख केला. ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संदर्भ दिला. या सोहळ्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांना बोलावलं होतं, पण गोरगरीब दिसले नाहीत, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर “मीडियामध्येही सर्वसामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. दिवसभर फक्त मोदींना दाखवलं जातं. त्यानंतर ऐश्वर्याचा डान्स दिसतो, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन बल्ले बल्ले करताना निघून जातील. ते गरीबांबद्दल काहीच दाखवत नाहीत”, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली होती. यावरून सोशल मीडियावर राहुल गांधींबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रानेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोना मोहपात्राने राहुल गांधींना सुनावत ऐश्वर्याची बाजू घेतली. राजकीय फायद्यासाठी नेत्यांनी महिलांना अपमानित करणं सोडलं पाहिजे, असंही तिने सुनावलंय. सोनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलंय, ‘आपल्या राजकीय फायद्यासाठी काही नेते त्यांच्या भाषणात महिलांचा अपमान करत आहेत. यामागचं कारण काय? प्रिय राहुल गांधी, नक्कीत भूतकाळात कोणीतरी तुमच्या आईला आणि बहिणीला अशाप्रकारे अपमानित केलं असणार. जरी नसलं तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत असलं पाहिजे. आणि हो, ऐश्वर्या राय खूप सुंदर डान्स करते.’

हे सुद्धा वाचा

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमावरून मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिलात? त्या ठिकाणी एकही ओबीसी चेहरा होता का? त्याठिकाणी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि नरेंद्र मोदी होते.” प्रयागराजमधील सभेतील राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ऐश्वर्या राय उपस्थितच नव्हती. या समारंभात अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेकसोबत गेले होते. अमिताभ बच्चन यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभातील फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यातही ऐश्वर्या राय कुठेच दिसली नव्हती.