मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या स्मृती इराणी या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. चाहत्यांसोबत त्या अनेकदा एखाद्या जुन्या चित्रपटाचा गमतीशीर व्हिडीओ किंवा इतर मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकतीच त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील एक क्लिप शेअर करत चाहत्यांना सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा हसून हसून लोटपोट होत आहेत.
स्मृती इराणी यांनी ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ या मालिकेचे दोन व्हिडीओ क्लिप शेअर केल्या आहेत. यामध्ये दयाबेन आणि जेठालाल हे मजेशीर विनोद करताना दिसत आहेत. या व्हिडीओत जेठालाल दयाबेनला म्हणतात, “जेव्हा अक्कल वाटली जात होती, तेव्हा तू कुठे होतीस?” त्यावर दयाबेन उत्तर देते की ती जेठालालसोबत सप्तपदी घेत होती. तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये दयाबेन विचारते की “एक क्विंटल गहूमध्ये किती गहू असतात?” याचं उत्तर देताना जेठालाल म्हणतो त्याला माहीत नाही. तेव्हा दयाबेन जेठालालला बदाम खायला दिल्यानंतर विचारते की “एक डझन केळ्यामध्ये किती केळी असतात?” तेव्हा जेठालाल लगेच उत्तर देतो की “बारा”. अचूक उत्तर ऐकल्यानंतर दयाबेन म्हणते “पाहिलंच का बदामचा कमाल.”
तारक मेहता.. मालिकेचे हे दोन व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना सल्ला दिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, “या कथेचं सार हेच आहे की जे कोणी सप्तपदी घ्यायला जात असतील, त्यांनी कृपया बदाम खाऊन जावं. दयाबेन रॉक्स. पहिल्या क्लिपची कर्टसी (श्रेय) इंटरनेटला आणि दुसऱ्या क्लिपची कर्टसी जेठालालला.”
स्मृती इराणी यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘होय, बदाम खाणं गरजेचं आहे. आजच एक लीटर बदाम घेऊन येतो’, असं एकाने मस्करीत म्हटलं आहे. तर अनेकांनी दयाबेन – जेठालालच्या जोडीला ऑल टाइम फेव्हरेट जोडी म्हटलंय.