दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या साखरपुड्याचे फोटो अवघ्या काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोभिता तिच्या साखरपुड्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने नाग चैतन्यसोबतच्या लग्नाविषयीही सांगितलं. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यामुळे नाग चैतन्यसोबतच्या साखरपुड्यानंतर सोभिताला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोभिता म्हणाली, “साखरपुड्याबाबत माझ्या फारशा अपेक्षा किंवा स्वप्न नव्हती. मला फक्त त्या क्षणांचा आनंद घ्यायचा होता. तो अनुभव अत्यंत साधा आणि तितकाच खास होता. मी जसा विचार केला होता तसंच सगळं पार पडलं होतं. जेव्हा गोष्टीच इतक्या सुंदर घडत असतील, तेव्हा त्यात आणखी काही भरजरीची गरज नसते. ते क्षण तुमच्यासाठी पुरेसे ठरतात. ते सर्वकाही परफेक्ट होतं. मातृत्वाचा अनुभव घेण्याबद्दल मी नेहमीच सकारात्मक होते. याबाबतीत मी खूप स्पष्ट आहे. लग्नाबाबतही मी नेहमीच सकारात्मक होती.”
लग्न किंवा लग्नासारखं खास निमित्त असेल तर पोशाखाच्या बाबतीत आपले विचार मांडताना सोभिता पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्याच्या लग्नाचे फोटो पाहता, तेव्हा त्यातून तुम्हाला त्यांची संस्कृती, त्यांचं मूळ, त्यांचा वारसा या सर्वांची झलक पहायला मिळते. हल्ली मिनिमल गोष्टींचा ट्रेंड आहे, पण मला ते आवडत नाही. एखाद्या दिवसासाठी मिनिमल लूक ठीक आहे, पण असा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर मला त्यानुसार भरजरी कपडे आणि दागिने खूप आवडतात.”
नात्यातली अशी कोणती गोष्ट तुला फार आवडते, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सोभिता म्हणाली, “माझ्यासाठी विनोद फार महत्त्वाचा आहे. आयुष्यात काही हलकेफुलके क्षण फार महत्त्वाचे असतात. नात्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आयुष्यात विनोद असणं खूप महत्त्वाचं असतं.”
“जर मला या गोष्टी भेटल्या तर मी नात्याला होकार देईन किंवा नाही भेटल्या तर नकार देईन या दृष्टीकोनातून मी कोणत्याच नात्याकडे पाहू शकत नाही. एखाद्या भावनेकडे किंवा नात्याकडे पाहण्याचा हा दृष्टीकोनच असू शकत नाही. एखाद्या नात्यात तुम्ही जे अनुभवता, त्यातून ते घडत जातं आणि त्यातूनच त्याला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने काही केल्यावर किंवा एखाद्याने काही सांगितल्यावर मी ते नातं थेट संपवणारी मुलगी नाही”, अशा शब्दांत सोभिता व्यक्त झाली.