अभिनेता सैफ अली खान आणि सोहा अली खान यांचे वडील मन्सूर अली खान यांचा रविवारी 84 वा जन्मदिन होता. यानिमित्त सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत सोहा तिच्या वडिलांच्या कबरीवर गेली. तिथे त्यांनी मेणबत्ती, केक आणि पत्र ठेवलं. सोहाने वडिलांप्रती असलेल्या प्रेमापोटी हे सर्व केलं असलं तरी काही नेटकऱ्यांना तिची ही कृती अजिबात आवडली नाही. हे सर्व इस्लामच्या नियमांच्या विरोधात असल्याची टीका काहींनी केली. सोहाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये चिमुकली इनायासुद्धा आजोबांच्या कबरीवर केकचा तुकडा ठेवताना आणि मेणबत्ती विझवताना दिसतेय. सोहाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
‘जेव्हा तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल शून्य ज्ञान असतं.. तुम्ही फतेहा वाचलं पाहिजे आणि हे सर्व करू नका. इस्लाममध्ये या सर्व गोष्टींना परवानगी नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे काय आहे? त्यापेक्षा त्यांच्यासाठी कुराण वाच, दुआ झिक्र कर’, असा सल्ला दुसऱ्याने दिला आहे. ‘प्रिया सोहा मॅडम, आपण कबरीचे फोटो नाही काढले पाहिजे. त्याचप्रमाणे कबरीवर केक किंवा इतर खाद्यपदार्थ ठेवू नयेत. त्यांना फक्त आपल्या दुआची गरज असते’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काहींनी सोहाची बाजू घेत नेटकऱ्यांना ट्रोल न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘आपण जेव्हा खुश असतो, तेव्हा देवसुद्धा खुश असतो. त्यामुळे ज्यांना जसं करायचं आहे, तसं करू द्या’, असं काहींनी म्हटलं आहे.
मन्सूर अली खान हे पतौडी म्हणूनही ओळखले जातात. भारतीय क्रिकेट विश्वात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांनी 1960 ते 1970 पर्यंतत भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. ते त्यांच्या शांत स्वभावासाठीही ओळखले जायचे. 1968 मध्ये त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं. धर्माची सीमा ओलांडून लग्न करणं त्याकाळी सहज सोपं नव्हतं. शर्मिला टागोर यांना एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता.