अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये सीमाने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर सीमा सध्या कोट्यधीश बिझनेसमन विक्रम अहुजाला डेट करतेय. विशेष म्हणजे 1998 मध्ये सोहैलशी पळून जाऊन लग्न करण्याआधी सीमाचा याच विक्रमसोबत साखरपुडा झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या घटस्फोटानंतर, दोन मुलांची आई झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडण्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाली, “खरंतर या वयात पुन्हा रिलेशनशिपमध्ये येणं सोपं नाही. कारण तुम्ही तरुण नसता. मी तरुण नाही. माझा घटस्फोट झालाय, माझी दोन मुलं आहेत आणि माझ्या पार्टनरलाही दोन मुलं आहेत. आता या नात्यात दोघांपेक्षा अधिक लोकं समाविष्ट आहेत. तरुणपणी ब्रेकअप झाल्यानंतर मूव्ह ऑन होणं वेगळं असतं. आता या वयात तुम्हाला प्रत्येकाच्या भावना समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. आता गोष्टी फक्त तुमच्यापुरत्या मर्यादित नसतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर.. इतकंच नसतं. पण माझ्या मते, हे सर्व योग्य वेळेनुसार घडत जातं.”
“एकटं राहणं खूप कठीण आहे आणि सिच्युएनशनशिपमुळे मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. अशा बाबतीत मी जरा जुन्या विचारांची आहे. मला रिलेशनशिपच्या या मॉडर्न संकल्पना पटत नाहीत. मी तशी व्यक्ती नाही. मला कॅज्युअल नाती आवडत नाहीत. जर मी एखाद्या व्यक्तीमध्ये माझा वेळ गुंतवत असेन तर मी माझे सर्व प्रयत्न करते”, असं सीमा पुढे म्हणाली. सीमा आणि सोहैल खान हे 2022 मध्ये विभक्त झाले.
सीमा आणि सोहैल यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. घटस्फोटाआधी दोघं वेगवेगळे राहू लागले होते. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर सीमाला हळूहळू या गोष्टीची जाणीव होऊ लागली की मुलांना पालकांकडून काय हवं असतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “आता घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर मी हे समजू शकतेय की मुलांना काय हवं असतं? आपले दोन्ही पालक सोबत राहावेत, एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते. हे सर्वांत महत्त्वाचं आहे आणि दोघांनी एकमेकांसोबत खुश राहावं, असं त्यांना वाटतं. मुलांसाठीही ही गोष्ट चांगली असते. त्यांना कुठेही अडकू नये असं वाटतं.”