अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी 2020 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सीमा वांद्र्यातील घर सोडून दुसरीकडे राहू लागली होती. मात्र मुलांच्या आग्रहाखातर ती पुन्हा एकदा वांद्र्यात शिफ्ट झाली. सध्या ती नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये झळकतेय. या शोच्या तिसऱ्या सिझनमध्ये सीमा तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पालकांनी विभक्त होण्याबद्दल मुलांना सर्वकाही नीट समजावून सांगणं खूप गरजेचं असतं, असं ती म्हणाली. “मुलांना सुरुवातीला सत्य पचवणं थोडं अवघड होऊ शकतं पण नंतर हळूहळू त्यांना गोष्टी समजू लागतात की माझ्या आईने मला खोटं सांगितलं नाही”, असं मत सीमाने मांडलं.
शोमध्ये खासगी आयुष्याविषयी बोललं जाईल याची जाणीव आधीपासूनच होती, असं सीमा म्हणाली. याविषयी ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती पुढे म्हणाली, “शोमध्ये माझ्या घटस्फोटाविषयी बोललं जाईल हे माहीत होतं पण किती बोललं जाईल हे मला माहीत नव्हतं. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंही नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मी अपेक्षा बाळगत नाही. कारण जेव्हा तुम्ही अपेक्षा बाळगता, तेव्हा तुम्ही अधिक बोलून जाता किंवा फार कमी बोलता. यामुळे तुमच्या बोलण्याचाही चुकीचा अर्थ निघू शकतो. पहिल्याच सिझनदरम्यान माझ्या आईने मला सांगितलं होतं की प्रामाणिक राहून हा शो कर. माझा हाच मंत्र आहे.”
“मला असंवेदनशील बनायचं नाहीये. कारण माझ्या वागण्याचे परिणाम माझ्या मुलांवरही होतील. माझी मुलं खूप लहान आहेत. एक शाळेत जातो आणि दुसरा त्याच्या करिअरमध्ये काहीतरी करण्याच्या मार्गावर आहे. माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यावर कोणताच परिणाम होऊ नये, याची काळजी मी घेत असते. त्यामुळे त्यांच्यासोबत जेव्हा असे संवाद होतात, तेव्हा मी जे खरं आहे ते सांगते. माझा मोठा मुलगा निर्वाण माझ्यासारखाच आहे. मी त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करते. कारण माझा दुसरा मुलगा योहान त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. कधीकधी योहानचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी मला निर्वाणची मदत घ्यावी लागते”, असं सीमाने सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “योहान लहान असला तरी आम्ही घटस्फोटाबाबत त्याच्याशीही स्पष्टपणे बोललो होतो. मी माझ्या मुलांना नेहमी एक गोष्ट सांगत आले की तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट मला सांगा, मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. तसंच मीसुद्धा तुम्हाला माझी गोष्ट सांगेन आणि तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे योहान लहान असला तरी मी त्याला घटस्फोटाबद्दल खोटं सांगितलं नाही. कारण माझ्या मते बाहेरून त्यांना ही गोष्ट समजलीच असती. माझ्या आईने मला खोटं सांगितलं असं त्याला कधीच वाटू नये, असा माझा विचार होता. चांगलं, वाईट, सत्य, असत्य सगळं त्याला माहीत असलं पाहिजे. अन्यथा ते सतत संभ्रमात राहतील आणि सतत विचार करण्याचा प्रयत्न करतील. सत्य कदाचित सुरुवातीला थोडं त्रासदायक असेल, पण नंतर त्यांना समजेल की त्यांच्या आईने त्यांना खोटं सांगितलं नव्हतं. म्हणूनच शाळेत किंवा इतर कुठेही काही झालं तरी तो माझ्याकडे येऊन सगळं सविस्तर सांगतो. मग मी त्याला गोष्टी समजावून सांगते.”
“तुम्हाला तुमच्या मुलांसोबत मोकळा संवाद साधावाच लागेल. तुमच्या मुलांना तुम्हाला मित्रांसारखंच वागवावं लागेल. मी जशी लहानाची मोठी झाले, तसं माझ्या मुलांना मोठं करू शकत नाही. आता आपण त्या विश्वात राहत नाही. आता आपण एका अशा विश्वात राहतो, जिथे इंटरनेटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मी जरी त्याला सांगितलं नाही तरी एका क्लिकवर त्याला सगळं काही समजू शकतं”, असं मत सीमाने मांडलं.