मुंबई | 18 जुलै 2023 : सोनी टीव्हीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासोबतच अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये स्पर्धकांकडून एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर केले जातात. जे परफॉर्मन्स सोनालीला आवडतात, त्यावरून ती स्पर्धकांचं दिलखुलास कौतुक करताना दिसते. मात्र गेल्या आठवड्यात एका स्पर्धकाचं कौतुक करताना सोनाली असं काही बोलून गेली, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. स्पर्धकाचं कौतुक करताना सोनाली चुकून जानकी म्हणजेच सीता मातेला भगवान कृष्णाची आई असल्याचं म्हणाली.
‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’च्या या एपिसोडमध्ये परफॉर्म केल्यानंतर समर्पण नावाचा स्पर्धक त्याच्या आयुष्यातील दोन आईंची आठवण काढतो. सोनाली जेव्हा समर्पणचा व्हिडीओ पाहते, तेव्हा तीसुद्धा खूप भावूक होते. भावनेच्या भरात सोनाली त्याला म्हणते, “समर्पण तू नशिबवान आहेस की तुझ्याकडे दोन आई आहेत. भगवान कृष्ण यांच्याही दोन आई होत्या, जानकी आणि यशोदा. तुझ्याकडेही दोन आईंचा आशीर्वाद आहे.”
आदरणीया @iamsonalibendre जी,
भगवान श्री कृष्ण जी की दो माँ थीं देवकी माँ और यशोदा माँ…जानकी जी माँ सीता का नाम है।
आशा है आप ध्यान रखेंगी। ??#IndiasBestDancer @SonyLIV #SonyLiv pic.twitter.com/UHe83LgJBq— Ravi Bhadoria (@ravibhadoria) July 15, 2023
भावनेच्या भरात सोनाली बेंद्रे जानकीला कृष्ण भगवानची आई म्हणते, पण एडिटरकडूनही हा भाग तसाच राहतो. त्यावेळी सोनाली किंवा तिथे उपस्थित असलेल्या इतरांनाही ही चूक लक्षात येत नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यावरून नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली. कृष्णाची आई जानकी नाही तर देवकी होती, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. अनेकदा शोमध्ये झालेल्या या चुका तशाच ऑन एअर दाखवल्या जातात. याआधी बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमधील असाच एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
बिग बॉस ओटीटी 2 च्या सेटवरील सलमान खानचा हातात सिगारेट असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा एपिसोड स्ट्रिम झाल्याच्या काही वेळानंतर निर्मात्यांनी ती क्लिप हटवली. अशा रिॲलिटी शोजची शूटिंग एकापेक्षा अनेक कॅमेऱ्याने होत असते. त्यामुळे कलाकारांकडून नकळत काही चूक झाली तर एडिटिंगदरम्यान ती चूक दुरुस्त केली जाते किंवा हटवली जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. ज्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.