अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. कॅन्सरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर ती अभिनयक्षेत्रात पुन्हा परतली आहे. ‘द ब्रोकन न्यूज’ या आगामी वेब सीरिजमध्ये ती एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली तिच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सोनालीचं नाव अनेकदा इंडस्ट्रीतल्या विविध अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. त्याविषयीही तिने प्रतिक्रिया दिली आहे. “कशात काहीच तथ्य नसतानाही माझ्या खासगी आयुष्याविषयी लिहिलं जायचं. कधी कोणासोबत अफेअर तर कधी कोणाशी कोल्ड वॉर.. असं सतत मला वाचायला मिळायचं. पण त्यात कधीच सत्य नव्हतं”, असं ती म्हणाली.
“इंडस्ट्रीत काम करताना सुरुवातीच्या काळात असे अनेक निर्माते होते, जे कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल होणाऱ्या अशा अफवांना आणखी प्रोत्साहन द्यायचे. यामुळे त्यांच्या प्रोजेक्टविषयी अधिक चर्चा व्हायची. मात्र हल्ली ही गोष्ट फार बदलली आहे. आजकाल अशा गोष्टींबद्दल आधी कलाकारांशी चर्चा केली जाते. पण आमच्या वेळी त्यात आम्हाला काहीच बोलण्याचा अधिकार नव्हता,” असं सोनालीने सांगितलं.
नव्वदच्या दशकात सोनालीचं नाव अभिनेता सुनील शेट्टीसोबत जोडलं गेलं होतं. “फक्त चित्रपट चर्चेत राहावा म्हणून मुख्य कलाकारासोबत तुमच्या अफेअरच्या चर्चा चघळल्या जायच्या. ही गोष्टसुद्धा ते इतक्या मेहनतीने करायचे की कधीकधी त्यामुळे चित्रपटसुद्धा हिट व्हायचा. पण मला या गोष्टी नेहमीच विचित्र वाटायच्या. फिल्म इंडस्ट्रीत एखाद्या कलाकाराविषयी प्रेक्षकांच्या मनात ठराविक समज निर्माण करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जायची. यामुळेच मला अनेकदा सांगितलं गेलं की तू आर्थिकदृष्ट्या सक्षक कुटुंबात आल्याचं सर्वांना सांगत जा. पण लोकांमध्ये हा समज कोणत्या मर्यादेपर्यंत निर्माण करायचा, हा एक प्रश्नच आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेय, हे अनेकांनी लपवण्याचा सल्ला दिला होता”, असा खुलासा सोनालीने केला.
आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय, हेच सत्य लोकांसमोर मांडावं, अशी सोनालीची अपेक्षा होती. मात्र तिच्या अनेक सहकलाकारांनी फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खोटी पार्श्वभूमी उभारल्याचंही तिने सांगितलं. “आम्ही खूप श्रीमंत कुटुंबातून आलोय, असा दिखावा करण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. पण सुरुवातीपासून मी मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याचं स्पष्ट केलं होतं. कारण मी खोटं बोलण्याबद्दल कम्फर्टेबल नव्हते. पण माझ्या अनेक सहकलाकारांनी हे केलंय. पण याचा परिणाम असा होतो की जेव्हा तुम्ही खोट्या गोष्टी सांगता, तेव्हा कधी ना कधी तुम्हीच त्यात अडकता. जेव्हा लोकांना समजतं की यात काही खोटं आहे, तेव्हा ते त्यातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात”, असं सोनालीने स्पष्ट केलं.