कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? सोनाली बेंद्रेचा खुलासा

| Updated on: Apr 29, 2024 | 3:03 PM

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर ती उपचारासाठी न्यूयॉर्कला गेली होती. 2021 मध्ये उपचारानंतर ती कॅन्सरमुक्त झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या आजारपणाविषयी व्यक्त झाली.

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? सोनाली बेंद्रेचा खुलासा
Sonali Bendre
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या न्यूजरुम ड्रामा सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मे महिन्यात ही सीरिज ‘झी5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली तिच्या आजारपणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती आणि त्या परिस्थितीचा सामना कसा केला, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सोनाली म्हणाली, “जेव्हा मला समजलं की मला कॅन्सर झालाय, तेव्हा पहिला विचार माझ्या डोक्यात आला, तो म्हणते ‘मीच का?'”

“हे एक वाईट स्वप्न आहे, असं समजून मी झोपेतून उठायचे. माझ्यासोबत असं घडू शकतं यावरच माझा विश्वास नव्हता. तेव्हापासून मी माझे विचार बदलण्यास सुरुवात केली. मीच का? असा प्रश्न विचारण्याऐवजी ‘मी का नाही?’ असा प्रश्न मी स्वत:ला करू लागली. हा आजार माझ्या बहिणीला किंवा मुलाला झाला नाही, याविषयी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होऊ लागली. त्याचा सामना करण्याची ताकद माझ्यात होती, सर्वोत्कृष्ट रुग्णालय निवडण्याचा पर्याय माझ्याकडे होता आणि यातून बाहेर पडण्यासाठी लागणारा आधारसुद्धा मला मिळाला होता. मी का नाही, असा प्रश्न विचारू लागल्यापासून त्यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप मदत झाली”, असं तिने पुढे सांगितलं.

हे सुद्धा वाचा

उपचारानंतर भारतात परतल्यानंतर सोनालीचे फोटो-

2018 मध्ये सोनालीला चौथ्या स्टेजचं मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं होतं. न्यूयॉर्क सिटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 2021 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. तेव्हापासून सोनालीने कॅन्सरच्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तिने अनेक कॅन्सरग्रस्तांना मदत केली. 2021 मध्ये जून महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्तानं तिनं एक पोस्ट लिहिली केली होती. आपण कर्करोगावर कशी मात केली आणि जगण्याची इच्छाशक्ती किती गरजेची असते हे तिनं या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे होता.