मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलमधल्या या प्रवासाची सुरुवात काही खास झाली नाही. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या हार्दिक पांड्याच्या नव्या टीमने ‘आयपीएल 2024’मध्ये आतापर्यंत दोन्ही सामने गमावले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन्ही क्रिकेटच्या स्टेडियमवरसुद्धा त्याला प्रेक्षकांकडून चिडवण्यात आलंय. हार्दिक जर बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करत असेल किंवा बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनला परत जात असेल तेव्हा प्रेक्षकांकडून मुद्दाम रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली जातेय. याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र खेळाडूंना दिली जाणारी ही वागणूक अभिनेता सोनू सूदला अजिबात आवडली नाही. याविषयी त्याने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट लिहिली आहे.
सोनू सूदने त्याच्या या पोस्टमध्ये हार्दिक पांड्याचा उल्लेख केला नाही. मात्र त्याची ही पोस्ट हार्दिकला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगविरोधात असल्याचं स्पष्ट होतंय. आपल्या देशाचे खेळाडू हे आपले हिरो आहेत, असं त्याने लिहिलंय. ‘आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंमुळे आपल्याला देशाचा अभिमान वाटतो, जे खेळाडू आपल्या देशाची मान उंचावतात. एके दिवशी तुम्ही त्यांचा जयजयकार करता, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना चिडवता. यामुळे ते नव्हे तर आपण अपयशी ठरतोय. मला क्रिकेट आवडतो. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रँचाइजीसाठी खेळतोय याने मला फरक पडत नाही. तो कर्णधार म्हणून खेळतोय की संघातील तो 15 वा खेळाडू आहे, यानेही मला फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत’, असं सोनू सूदने म्हटलंय.
We should respect our players. Players who made us proud, players who made our country proud. One day you cheer for them, next day you boo them.
It’s not they, it’s us who fail.
I love cricket.
I love every cricketer who represents my country.
Doesn’t matter which franchise…— sonu sood (@SonuSood) March 29, 2024
आयपीएल 2024 च्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्स हा संघ विविध कारणांमुळे वादात सापडला. IPL 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ऑल-कॅश डीलसोबत ट्रेड केल्यापासून मुंबई इंडियन्स टीममध्ये वादाच्या विविध बातम्या समोर येत होत्या. आयपीएल 2024 च्या आधी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवलं गेलं होतं. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं चाहत्यांना आवडलं नाही. त्यातच मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या दोन्ही सामन्यांदरम्यान हार्दिक पांड्याला स्टेडियमवर प्रचंड ट्रोल केलं गेलंय.